सांगली : एप्रिल, मे महिन्यात जम्मू-काश्मीरला फिरायला जाणे, म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणीच म्हणावी लागेल. म्हणूनच जिल्ह्यातून ६६ पर्यटक जम्मू-काश्मीरला गेले आहेत, पण काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केल्यामुळे अनेक पर्यटकांनी अर्ध्या रस्त्यातूनच सांगलीकडे परतीचा प्रवास सुरू केला आहे. १५ पर्यटक शुक्रवारी सांगलीत दाखल झाले असून, जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी त्यांच्याशी संवाद साधला आहे.जिल्हाधिकारी काकडे यांनी पहलगाम येथे २२ एप्रिलला हल्ला झाल्यापासून पर्यटकांच्या संपर्कात होते. जिल्हा प्रशासनाची यंत्रणाही त्यांनी कामाला लावली होती. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ यांनी पर्यटकांशी समन्वय साधून परतीच्या प्रवासासाठी मदत केली. शुक्रवारी जम्मू-काश्मीर येथून आलेले प्रमोद जगताप, फुलचंद शिंदे आणि त्यांचे कुटुंबीय जिल्हाधिकारी काकडे यांनी संवाद साधून घटनेबाबत सविस्तर माहिती घेतली. प्रमोद जगताप, फुलचंद शिंदे यांनी जिल्हा प्रशासन सातत्याने संपर्कात होते. याबाबत जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनाचे त्यांनी आभार मानले.
सांगली जिल्ह्यातील ६६ पर्यटक काश्मीर येथे अडकले आहेत. त्यामधील २४ पर्यटक सुखरूपपणे जम्मू काश्मीरबाहेर पडले आहेत. यातील १५ पर्यटक सांगली जिल्ह्यात पोहोचले असल्याची माहिती प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय पवार यांनी दिली आहे.
कुंडलचे पर्यटक रविवारी येणारपलूस तालुक्यातील कुंडल येथील अविनाश लाड, शोभा लाड, वैभव लाड, संगीता लाड, विकास लाड, दिपाली विकास लाड, नितीन लाड व दिपाली नितीन लाड हे सर्व पर्यटक जम्मू येथून रेल्वेला बसले आहेत. रविवारी किर्लोस्करवाडी येथील रेल्वे स्टेशनला येणार आहेत. आम्ही सुखरूप असून, फिरताना कोणताही त्रास झाला नाही, असे अविनाश लाड यांनी सांगितले.
राजपूत, जगदाळे कुटुंबीय आज येणारसांगली शहरातील प्रतापसिंह राजपूत, ज्योती राजपूत, संतोष जगदाळे, वर्षा जगदाळे हे कुटुंबीय पहलगाम येथे हल्ला झाला, यावेळी राजपूत व जगदाळे कुटुंबीयही पहलगाम येथेच जाणार होते, पण वाहन चालकाने पहलगामऐवजी अन्य ठिकाणी जाण्याची सूचना दिली. यामुळे राजपूत व जगदाळे कुटुंबीयांचा दौरा सुरळीत झाला आहे, अशी माहिती प्रतापसिंह राजपूत यांनी दिली, तसेच ते म्हणाले, आम्ही श्रीनगरमधून विमानाने पुणे येथे शुक्रवारी संध्याकाळी येणार आहे. शनिवारी सांगलीत असणार आहे.