देवराष्ट्रे : कडेगाव, खानापूर आणि तासगाव या दुष्काळी तालुक्यातील बहुतांशी शेतीला वरदान ठरलेल्या ताकारी योजनेचे लांबलेले आवर्तन १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे, अशी माहिती ताकारी-म्हैसाळ सिंंचन व्यवस्थापन विभागाच्या उपकार्यकारी अभियंता योगीता पाटील यांनी दिली. थकीत वीजबिल भरण्याच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून जमा झालेली पाणीपट्टी गोळा करण्यासाठी ११ नोव्हेंबरला लाभक्षेत्रातील कारखान्यांच्या अध्यक्षांची बैठक घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले, मात्र योजनेचे आवर्तन १ महिना लांबल्याने लाभक्षेत्रातील हजारो हेक्टर ऊस पिकाला याचा फटका बसला आहे.कायम दुष्काळी असणाऱ्या ताकारी योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी केवळ योजनेच्या जिवावर हजारो हेक्टर क्षेत्रात ऊस, भाजीपाला यासारख्या पिकांची मोठ्याप्रमाणात लागण केली आहे. अशातच मान्सूनच्या परतीच्या पावसाने या परिसराकडे पाठ फिरविल्याने सध्या पाण्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. लाभक्षेत्रातील अनेक भागातील विहिरींनी तळ गाठला असून, काही विहिरीतील पाणी एक-दोन तासच सुरू राहत आहे. त्यामुळे उसासारखी जास्ती पाण्याची गरज असणारी पिके अक्षरश: वाळू लागली आहेत.मागील काही वर्षांचा ताकारी योजनेच्या आवर्तनाचा विचार केल्यास, या दिवसात कधीच पाण्याचा तुटवडा जाणवत नव्हता. मात्र यावर्षी उलट परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. ऊस कारखान्यांना जाण्याच्या वेळेस या पिकाला जास्त पाण्याची गरज असतानाच पाणी मिळत नसल्याने ऊसशेती वाळू लागली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना वजनाला फटका बसणार असून, शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार असल्याचा जाणकारांचा अंदाज आहे. यामुळे तात्काळ हे आवर्तन सुरू करण्याची मागणी होत आहे.मात्र ताकारी योजनेचे ७ कोटी २७ लाख आणि सोनसळ येथील टप्प्याचे १ लाख ३५ हजार रूपये वीज बिल थकीत असल्याने योजनेचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.कारखान्यांकडे शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून कपात केलेले पाणीपट्टीचे कोट्यवधी रूपये जमा आहेत, मात्र ही रक्कम ‘ताकारी’च्या सिंंचन व्यवस्थापन विभागाकडे वर्ग केली नसल्याने, आवर्तन लांबल्याचा आरोप अधिकारी करीत आहेत.याबाबत ताकारी-म्हैसाळ सिंंचन व्यवस्थापन विभागाच्या उपकार्यकारी अभियंता योगीता पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, आवर्तन १५ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार असल्याचे व त्यासाठी परिसरातील कारखान्यांच्या अध्यक्षांची बैठक ११ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार असल्याचे सांगितले. (वार्ताहर )आज सांगलीत बैठकताकारी योजनेचे या वर्षातील पहिले आवर्तन चालू करण्यासाठी योजनेच्या परिसरातील कारखानदारांची बैठक सांगली येथे ११ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीत शेतकऱ्यांकडील पाणीपट्टी वसुली, कारखानदारांकडूनची वसूल झालेली येणेबाकी, वीज कनेक्शन जोडणी यांसह विविध विषयांवर निर्णय घेण्यात येणार आहेत.
कारखानदारांमुळे ‘ताकारी’चे आवर्तन लांबले
By admin | Updated: November 11, 2016 00:03 IST