सांगली : महापाालिकेच्या क्षेत्रात अस्वच्छता आणि त्याकडे होणारे अक्षम्य दुर्लक्ष याबाबत मदनभाऊ युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी महापौर, उपमहापौर, स्थायी सभापती, आयुक्तांना स्वच्छतेची साधने भेटवस्तू महणून देऊन घरचा आहेर दिला. ‘आपले काम अतिशय चांगले असल्या’चे एक पत्रही देऊन त्यांना उपरोधिक टोलाही लगाविला. शहरातील अस्वच्छता वाढत चालली आहे. त्यामुळे शहरात डेंग्यू, स्वाइन फ्लू याचे आजार सातत्याने पसरत चालले आहेत. त्यामुळे नागरिकांचे जीवन धोक्यात येत आहे. याशिवाय अनेक साथीचे आजार पसरत असतानाही शहरात स्वच्छता होत नाही. त्यामुळे या संवेदनशील कारभाराकडे पदाधिकारी व आयुक्त सातत्याने दुर्लक्ष करत असल्याने त्यांनी त्यांच्याविरोधात गांधीगिरी केली आहे. महापौर विवेक कांबळे, उपमहापौर प्रशांत पाटील, स्थायी सभापती संतोष पाटील, आयुक्त ए. वाय. कारचे यांना दिलेल्या निवेदनात, ‘स्वच्छ आणि सुंदर सांगली’साठी आपण वेळोवेळी नालेसफाई करत आहात. स्वच्छता, शुद्ध पाणी पुरवठा, औषध फवारणी करुन शहरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी आपण अहोरात्र कष्ट उपजत आहात. त्याबद्दल आम्ही नेहमीच आपले ऋणी आहोत. या ऋणातून आम्ही कधीच उतराई होऊ शकत नाही. परंतु त्यासाठी आम्ही जी प्रेमाची भेटवस्तू पाठविली आहे, ती तुम्ही स्वीकारावी’, असे पत्रही त्यांना देण्यात आले आहे. या पत्रावर जिल्हाध्यक्ष सतीश साखळकर यांची स्वाक्षरी आहे. (प्रतिनिधी)
मदनभाऊ युवा मंचचा घरचा आहेर
By admin | Updated: December 17, 2015 23:19 IST