सांगली : येथील महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या गाडीची जोरात धडक बसल्याने शिराळा पंचायत समितीमधील पशुधन विकास अधिकारी जागीच ठार झाले. डॉ. सुहास नारायण देशपांडे (वय ४८, रा. लोकमान्य कॉलनी, शामरावनगर, सांगली) असे त्यांचे नाव आहे. वखारभागातील गुजराती हायस्कूलजवळ गुरुवारी दुपारी बारा वाजता हा अपघात झाला. या अपघातात सुदैवाने डॉ. देशपांडे यांची मुलगी मृदुला बचावली.डॉ. सुहास देशपांडे यांची आई आजारी असून, गेल्या काही दिवसांत त्यांची प्रकृती अधिकच खालावत गेली आहे. आईवर औषधोपचार व तिची सेवा करण्यासाठी डॉ. देशपांडे यांनी एक महिन्याची रजा काढली आहे. गुरुवारी दुपारी ते मुलगी मृदुला हिला सोबत घेऊन दुचाकीवरून (क्र. एमएच १० बीवाय ८५१६) वखारभागातील गुजराती हायस्कूलसमोर असलेल्या देना बँकेत पैसे काढण्यासाठी गेले होते. पैसे काढून दोघेही बँकेतून बाहेर पडले. मृदुला दुचाकी चालविणार होती. तिने बँकेसमोरून दुचाकी बाहेर काढली. दोघेही बँकेपासून थोडे पुढे गेले. तेवढ्यात समोरून महापालिकेच्या अग्निशामक दलाची गाडी (क्र. एमडब्ल्यूई १२१४) आली. त्यामुळे मृदुला घाबरली. तिला दुचाकीचा वेग कमी करता आला नाही. तिचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी अग्निशामक गाडीला धडकली. यामध्ये मृदुला उडून रस्त्याकडेला पडली; तर डॉ. देशपांडे गाडीच्या मागील चाकाखाली सापडून जागीच ठार झाले. अपघातानंतर अग्निशामक दलाच्या जवानाने गाडी थांबवली. शहर पोलीस दाखल झाले. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. मृतदेह शासकीय रुग्णालयात हलविला. अपघातग्रस्त दोन्ही गाड्या रस्त्यावरून बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली. अपघाताचे वृत्त समजताच डॉ. कुलकर्णी यांचे कुटुंबीय, नातेवाईक, मित्र व जिल्हा परिषद, तसेच शिराळा पंचायत समितीमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. शवविच्छेदन तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या अपघातात मृदुलाला कोणतीही दुखापत झाली नाही. सुदैवाने ती बचावली, पण डोळ्यासमोर वडिलांचा मृत्यू झाल्याने तिला जबरदस्त मानसिक धक्का बसला आहे. (प्रतिनिधी)दुसऱ्या खेपेला...शुक्रवारी बकरी ईद असल्याने जुना बुधगाव रस्त्यावरील ईदगाह मैदानावर अग्निशामक दलाच्या या अपघातग्रस्त गाडीने पाण्याचा मारा करून स्वच्छता केली होती. पाण्याची दुसरी खेप आणण्यासाठी ही गाडी गेली होती. मात्र परत येताना हा अपघात झाला.
सांगलीत अपघातात पशुधन अधिकारी ठार
By admin | Updated: September 24, 2015 23:55 IST