ओळ : आंधळी (ता. पलूस) येथील वाढीव गावठाणाबाबत तहसीलदार कार्यालयात बैठक झाली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, प्रांताधिकारी गणेश मरकड, निवास ढाने, स्मिता पाटील उपस्थित हाेते.
पलूस : आंधळी (ता. पलूस) गावाच्या वाढीव गावठाणाचा विषय लवकरच मार्गी लागेल. यासाठी भूमिअभिलेख कार्यालयाला चतु:सीमा निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती प्रांताधिकारी गणेश मरकड यांनी दिली.
आंधळी येथील वाढीव गावठाणाचा विषय गेली २० वर्षे प्रलंबित आहे. याप्रश्नी जिल्हा परिषद सदस्य शरद लाड यांनी प्रांताधिकारी गणेश मरकड, तहसीलदार निवास ढाणे, गटविकास अधिकारी स्मिता पाटील आणि ग्रामस्थांसमवेत तहसीलदार कार्यालयात बैठक घेतली. यावेळी वाढीव गावठाणाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. ५४ व्यक्तींना अद्याप भूखंड वाटप प्रलंबित आहे. ज्या लोकांनी शासकीय नियमानुसार रक्कम भरली आहे त्यांनाच भूखंड दिले जातील. इतर जागांवर असलेली बांधकामे अतिक्रमण समजून हटविण्यात येतील. यासाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि ग्रामपंचायत यांनी पुढाकार घेऊन अतिक्रमण हटवावीत, असे आदेश यावेळी देण्यात आले.