कवठेमहांकाळ : गोरगरिबांना, शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या सरकारला आता कायमचा धडा शिकविण्यासाठी आपण शेतकरी संघटनेच्यावतीने ठोस पावले उचलण्याचा निर्णय घेतला असून, विविध मागण्यांसाठी येत्या २० एप्रिलला हजारो शेतकऱ्यांसह, बैलगाडीवाल्यांसह, जवानांसह सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून या शासनाला बळीराजाच्या ताकदीचा हिसका दाखवू, असा खणखणीत इशारा शेतकरी संघटनेचे रघुनाथ पाटील यांची आज दिला. आज कवठेमहांकाळ येथील नाना कोरे कार्यालयात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची विविश्र प्रश्नांवर चर्चात्मक तसेच आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी बैठक पार पडली. यावेळी रघुनाथ पाटील बोलत होते.यावेळी ते म्हणाले की, अवकाळीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळेना. एफ.आर.पी.नुसार तर दर दिला जात नाहीच, परंतु बिलाची रक्कमही शेतकऱ्यांना कारखानदार वेळेवर देईनात. या एवढ्या समस्यांच्या गर्तेत राज्यातील शेतकरी सापडला असताना, राज्यातील व केंद्रातील भाजप सरकार झोपा काढत आहे काय? असा सवालही त्यांनी केला. हे सरकार भांडवलदारांचे समर्थन करणारे व शेतकऱ्यांना मारणारे आहे. भाजप सरकार जाणीवपूर्वक सत्तेचे राजकारण करण्यासाठी गांधारीची भूमिका बजावत आहे. गोरगरीब, शेतकऱ्यांसाठी हे शासन मदत करू शकत नसेल, तर भाजपने सत्तेतून पायउतार व्हावे. कवठेमहांकाळ, तासगाव, जत, मिरज, आटपाडी या तालुक्यातील शेतकरी, जनता पाणी पाणी म्हणून मरणप्राय यातना भोगत असताना, हे शासन थकित वीज बिलाचा खोडा घालत आहे. दहा हजार कोटी रुपये म्हैसाळ योजनेसाठी खर्च करून केवळ पाच कोटींच्या वीज बिलासाठी शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा उद्योग या शासनाने सुरू केला आहे. २० एप्रिलला हजारो शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरवून विराट मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढू व या सरकारला धडा शिकवू, असा इशाराही त्यांनी दिला आहे. बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठविण्यासाठी या दिवशी निर्णायक लढा उभारणार असल्याचे सांगितले.या तालुक्यातून शेतकऱ्यांनी, कामगारांनी, जवानांनी, व्यापाऱ्यांनी मोर्चासाठी मोठ्या संख्येने यावे, असे आवाहन शेतकरी संघटनेचे युवा नेते अशोकराव माने यांनी यावेळी केले.बैठकीस जिल्हाध्यक्ष हणमंतराव पाटील, महादेव कोरे, अशोकराव माने, शेखर कुरणे, बैलगाडी संघटनेचे नामदेव जानकर, नंदकुमार पाटील, संभाजी पवार, शंकर भोसले, पप्पू हजारे, लालाभाई जानकर उपस्थित होते. (वार्ताहर)प्रमुख मागण्या...म्हैसाळ योजना तातडीने सुरू करावी व शेतीला पाणी द्यावेशेतकऱ्यांच्या उसाला एफ.आर.पी.नुसार वेळेवर दर द्यावाबैलगाडी शर्यतीवरील बंद उठवावीगोवंश हत्याबंदी कायदा रद्द करावावन्यप्राणी संरक्षण कायदा दुरूस्त करावा, रद्द करावाअवकाळी नुकसानभरपाई तातडीने द्यावीभाकड जनावरांची जबाबदारी शासनाने घ्यावी
सरकारला बळीराजाचा हिसका दाखवू
By admin | Updated: April 3, 2015 23:58 IST