लोकमत न्यूज नेटवर्क
पुनवत : गेल्या काही महिन्यांपासून शिराळा तालुक्याच्या जवळपास सर्व भागात बिबट्याचा वावर दिसून येत आहे. दिवसेंदिवस बिबट्यांच्या हल्ल्यात वाढ होत असल्याने तालुक्यातील शेतकरी, नागरिक चिंतातूर आहेत. दरम्यान, बिबट्यांच्या वाढत्या वावराबाबत वन विभाग दक्षता घेत असून त्यांच्याकडून नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येत आहे .
शिराळा तालुक्यात वाड्यावस्त्यांची संख्या जास्त आहे. जंगल, डोंगर, दऱ्याखोऱ्या, गवताची राने अशी भौगोलिक विविधता आहे. त्यामुळे हे वातावरण बिबट्याच्या अधिवासास पोषक आहे. चांदोलीत अभयारण्यातील मांसभक्षी प्राणी भक्ष्याच्या शोधात भटकंती करीत तालुक्याच्या विविध भागात पोहोचल्याचे चित्र आहे. यामध्ये बिबटे, तरस, लांडगे यांचा समावेश आहे.
तालुक्यातील मांगले, बिऊर, तडवळे, अंत्री, वाकुर्डे, मांगरुळ, मेणी खोरे, आरळा आदी ठिकाणी बिबट्याने हल्ले केले आहेत. ऊसाची शेती बिबट्याचे आश्रयस्थान बनले आहे. यामुळे शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन शेतात जावे लागत आहे. अनेक पाळीव पाण्यांचा बिबट्याने फटशा पाडल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
चौकट
वनविभागाच्या मार्गदर्शक सूचना
नागरी वस्त्या बंदिस्त कराव्या
शेतात एकट्याने जाऊ नये
आडवाटेने जाताना बोलत, मोबाईलवर गाणी वाजवत जावे
घरांच्या परिसरात रात्री प्रकाश ठेवावा
बिबट्या दिसताच वनविभागाला कळवावे