कडेगाव : आसद (ता. कडेगाव) शिवारात डोंगरपायथ्याला मोहित्यांचे वडगाव, आसद सरहद्दीलगत सागरेश्वर अभयारण्यापासून जवळच्या अंतरावरील शेतामध्ये बिबट्याच्या पाऊलखुणा आढळल्या आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून वन विभागाने त्या ठिकाणी पिंजरा किंवा ट्रॅप कॅमेरा लावावा, अशी मागणी आसद येथील ग्रामस्थांनी केली आहे.
१९ नोव्हेंबर रोजी सागरेश्वर अभयारण्यात वन विभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये बिबट्याचे दर्शन झाले. त्यानंतर सागरेश्वर अभयारण्यापासून जवळच्या देवराष्ट्रे, मोहित्यांचे वडगाव, आसद, चिंचणी, पाडळी, कुंभारगाव आदी गावांतील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामीण भागात राहणाऱ्यांनी, फिरायला येणाऱ्यांनी रात्री व पहाटे एकट्याने जाऊ नये, बिबट्यापासून सतर्क राहावे, अशा सूचना आसदच्या सरपंच मनीषा जाधव यांनी दिल्या आहेत. या परिसरात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेल्या आठवड्यापूर्वी आसद येथील यशवंत जाधव यांच्या हळदीच्या शेतात बिबट्याच्या पायाचे ठसे दिसून आले होते. याबाबत आसद येथील नागरिकांनी वन विभागाला सांगितले आहे. मात्र वन विभागाने कोणतीही पुढील कार्यवाही केलेली नाही. बिबट्या भर वस्तीत येऊ नये, यासाठी सुरक्षेचा उपाय म्हणून वन विभागाने गस्त वाढविण्याची गरज आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची गरज आहे, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.
चौकट
दक्ष राहा; वन विभागाचे आवाहन
आसद गावाच्या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचा दावा नागरिकांनी
केला आहे. मात्र याबाबत अद्याप शहानिशा झालेली नाही. तरीही नागरिकांनी दक्ष राहावे. बिबट्या दिसल्यास अथवा चाहूल लागल्यास तात्काळ वन विभागाला कळवावे, असे आवाहन वन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी केले आहे.