लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : खानापूर तालुक्यातील चिंचणी (मंगरूळ) येथील काटेवडा तलावात टेंभू योजनेचे पाणी तत्काळ सोडवा, अशी मागणी पारे, चिंचणी, मंगरूळ परिसरातील शेतकऱ्यांनी केली असल्याची माहिती शिवप्रताप अॅग्रोटेकचे अध्यक्ष विठ्ठल साळुंखे यांनी दिली. याबाबत कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचेही साळुंखे म्हणाले.
टेंभू योजनेचे पाणी सोडण्यासाठी सध्या बंदिस्त जलवाहिनी केली आहे; परंतु ते पाइप अत्यंत लहान असल्याने काटेवडा तलाव पूर्ण क्षमतेने भरणे शक्य नाही. या तलावात टेंभूचे पाणी येणार, यासाठी शेतकऱ्यांनी विहिरी व पाइपलाइन करून तयार ठेवल्या आहेत. ज्या भागात शेतीला अजिबात पाणी मिळत नाही. त्या भागात या तलावामुळे शेतीला पाणी मिळणार आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्ण होणार असून, शेती फुलणार आहे; परंतु टेंभू योजनेच्या लहान बंदिस्त पाइपमुळे एकदाही काटेवडा तलाव भरला नाही. पर्यायाने शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. टेंभूचे पाणी काटेवडा तलावात आले नाही तर परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. या तलावात पाणी सोडल्यास शेतीबरोबरच चिंचणी गावच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न संपुष्टात येणार आहे. त्यामुळे टेंभूचे पाणी तातडीने काटेवडा तलावात सोडून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. या मागणीसाठी कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे अध्यक्ष विठ्ठल साळुंखे म्हणाले.