सांगली : शासनाच्या तंत्रनिकेतन संचलनालयाच्या वतीने येथील लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या पॉलिटेक्निक महाविद्यालयास परीक्षा सुविधा केंद्र मंजूर करण्यात आले आहे, अशी माहिती प्राचार्य अण्णसाहेब गाजी यांनी दिली.
गाजी यांनी सांगितले की, तंत्रशिक्षण संचलनालयाकडून २०२०-२१ या वर्षाकरिता प्रथम वर्ष डिप्लोमा प्रवेशप्रक्रिया ३० जूनपासून सुरू करण्यात आली आहे. यावर्षी दहावी उत्तीर्ण होणारा किंवा यापूर्वी दहावी उत्तीर्ण झालेला विद्यार्थी या प्रक्रियेत भाग घेऊ शकतो. दहावीचा निकाल लागण्यापूर्वीच ही प्रक्रिया नावनोंदणी सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थी ऑनलाइन नोंदणी किंवा सुविधा केंद्रावर प्रत्यक्ष कागदपत्रांची पडताळणी करू शकतात. यासाठी २३ जुलैपर्यंत अंतिम मुदत आहे. दहावीला ८५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना शुल्क सवलतही दिली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सुविधा केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.