कुपवाड : कुपवाड शहर व विस्तारित परिसरात महापालिकेच्या माध्यमातून अद्ययावत उद्याने विकसित करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची माहिती पालकमंत्री जयंत पाटील यांनी पत्रकारांना दिली. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पाटील यांनी कुपवाड परिसरातील चार ठिकाणच्या जागेची नुकतीच पाहणी केली.
कुपवाडचा अद्याप म्हणावा तसा विकास झाला नाही. शहरात एकही बगीचा नाही. अद्ययावत बागबगीचा व्हावा, अशी कुपवाडकरांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. याचा विचार करून पालकमंत्री जयंत पाटील यांनी सोमवारी सायंकाळी अचानक कुपवाड दौरा करून प्रभाग आठ, एक व दोनमधील उद्यानासाठीच्या जागांची पाहणी केली. जागा मिळाव्यात यासाठी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली.
यामध्ये कुपवाडच्या प्रभाग आठमधील विद्यानगर गल्ली नंबर एक येथील खुली जागा, शहरातील उल्हासनगर (महावीर व्यायाम शाळा परिसर), एकता काॅलनी व कापसे प्लॉट येथील रत्नप्रभा सोसायटी या चार ठिकाणी असलेल्या खुल्या जागांची पाहणी करण्यात आली. लवकरच या जागेवर अद्यावत बगीचा विकसित करून कुपवाडकरांचे स्वप्न पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे.
यावेळी आयुक्त नितीन कापडणीस, उपमहापौर उमेश पाटील, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, गटनेते मैनुद्दीन बागवान, नगरसेवक विष्णू माने, शेखर माने, शेडजी मोहिते, पद्माकर जगदाळे, सुनील भोसले, मधुकर पाटील, सागर खोत यांच्यासह मनपातील आधिकारी व राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.