तांदूळवाडी : कुंडलवाडी (ता. वाळवा) येथे कोरोनाच्या पहिल्या लाटेत १३ रुग्ण होते. पण, दुसरी लाट येण्यापूर्वीच ग्रामपंचायतीने योग्य नियोजन केल्यामुळे गावात सध्या एकही कोरोना रुग्ण नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
कुंडलवाडी हे गांव राष्ट्रीय महामार्गापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर आहे. या गावाचे दळणवळण पूर्ण पुणे राष्ट्रीय महामार्गावरील तांदूळवाडी या गावातून होते. येथील बरेच तरुण नोकरीच्या निमित्ताने कोल्हापूर, वडगांव, वाठार, इस्लामपूर व कोल्हापूर जिल्ह्यांतील कागल, शिरोली, गोकुळ शिरगाव येथील एमआयडीसीमध्ये कामाला ये-जा करत असतात. बाजार करण्यासाठी ग्रामस्थ बाहेरगावी जात आहेत तरीही कुडलवाडीत एकही कोरोनाचा रुग्ण अद्याप तरी सापडलेले नाही. त्यामुळे येथील नागरिक व शासकीय अधिकारी समाधानी आहेत. त्याचबरोबर येथील सर्व व्यावसायिकांनी सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन काटेकोरपणे अंमलबजावणी करत आहेत.
यावेळी पोलीस पाटील सुरैया इकबाल पटेल यांचे पती इकबाल बाळ पटेल, सरपंच रहिमशा शक्कर फकीर, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्या सहकार्याने कोरोनाचा फैलाव रोखला आहे.
चौकट
पहिल्या लाटेत १३ रुग्ण
कुंडलवाडीत पहिल्या लाटेतील नागरिकांच्या आरोग्य तपासणीत कोरोनाचे १३ रुग्ण सापडले होते. त्यावेळी संपूर्ण गावाला चांगलीच झळ बसली होती. यावेळी प्रांताधिकारी नागेश पाटील, तहसीलदार रवींद्र सबनीस, कुरळप पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांनी व आरोग्य विभागाने संपूर्ण गाव धारेवर धरले होते.