अडकित्त्यानं झाड तुटत नसतं!
गावाकडचे राजकारण म्हणजे एकापेक्षा एक इरसाल नमुन्यांचा भरणाच. जुन्या पिढीतल्या कारभाऱ्यांची तर स्टाईलच दणकेबाज. त्यांनी घातलेला एकेक तिढा सोडवायचा तर काही वर्षे निघून जातात. असाच एक गावठी किस्सा हसून हसून पुरेवाट करणारा. मिरज पूर्व भागात एक उत्साही कार्यकर्ता जुन्या-जाणत्यांपुढे फारच मिरवत होता. जणू त्यांना राजकीय आव्हानच देत होता. जुन्या कारभाऱ्यांना यावर कोणीतरी छेडले, युवा नेते फारच नाचायला लागलेत, हे नजरेला आणून दिले. कारभारी महावस्ताद, म्हणाले, ‘नाचू दे त्याला. अडकित्त्याला कितीही धार लावली तरी त्यानं झाड तुटत नसतं, धार संपंल, तेव्हा येईल गुमानं माघारी!’ वर्षानुवर्षे गावचावडीचे राजकारण केल्यानंतर मुरब्बीपणा येतो तो असा!!
किटल्या तापताहेत, सांभाळा
जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ सात-आठ महिनेच राहिला आहे. पुढच्या टर्मला जिल्हा परिषदेत एन्ट्री करु इच्छिणाऱ्यांची वर्दळ वाढली आहे. काहीजण विद्यमान सदस्यांसोबतच येतात आणि जिल्हा परिषदेच्या स्टाईलचा अंदाज घेतात. ही मंडळी येत्या निवडणुकीत आपल्याच साहेबांना ओव्हरटेक करायचा प्रयत्न करणार हे निश्चित. परवा एका बैठकीत या उदयोन्मुख सदस्यांविषयी चर्चा रंगली. एक अनुभवी नेते म्हणाले, ‘किटल्या तापताहेत, सांभाळा!’ तेव्हापासून काहींनी ‘किटल्या’ गावाकडेच ठेवून यायला सुरुवात केलीय म्हणे.