आष्टा : कारंदवाडी (ता. वाळवा) येथील कृष्णानगर हाळ येथे स्वतंत्र ग्रामपंचायत करण्याबाबतचा ठराव एकमताने मंजूर झाला आहे, अशी माहिती ग्रामपंचायत सदस्य संदीप सावंत यांनी दिली.
संदीप सावंत म्हणाले, कारंदवाडी कृष्णानगर व हाळ या परिसराची मिळून पूर्वीपासून कारंदवाडी ग्रामपंचायत आहे. मात्र कृष्णानगर व हाळ येथील ग्रामस्थांची गैरसोय होत असल्याने या ठिकाणी स्वतंत्र ग्रामपंचायत व्हावी, अशी ग्रामस्थांची मागणी होती. गेले वर्षभर लॉकडाऊन व कोरोना संकटामुळे हा विषय प्रलंबित राहिला होता. कारंदवाडी ग्रामपंचायत कार्यालयात आयाेजित मासिक बैठकीमध्ये स्वतंत्र कृष्णानगर हाळ ग्रामपंचायत करण्याबाबतचा ठराव एकमताने मंजूर होऊन तो पुढे पंचायत समितीकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. सरपंच पद्मजा कबाडे, उपसरपंच माणिक लवटे, ग्रामसेवक सचिन बिरनाळे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या सहकार्यामुळे कृष्णानगर-हाळ ग्रामस्थांची मागणी मान्य झाल्याचे संदीप सावंत यांनी सांगितले.