सांगली : जिल्हा पोलीस दलाच्यावतीने शुक्रवारी रात्री शहरात राबविण्यात आलेल्या ‘आॅपरेशन आॅल आऊट’ मोहिमेंतर्गत गुंडाविरोधी पथकाने गुंड बाळू भोकरे याच्या घरावर छापा टाकून झडती घेतली. बाळू सापडला नाही, परंतु त्याचा भाचा धीरज दिलीप आयरे (वय २०) यास पकडण्यात यश आले. खंडणीच्या गुन्ह्यात गेल्या तीन महिन्यांपासून तो गुंगारा देत फरारी होता.जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख शशिकांत बोराटे यांनी शुक्रवारी रात्री ‘आॅपरेशन आॅल आऊट’ मोहीम राबविली. या मोहिमेंतर्गत रेकॉर्डवरील गुन्हेगारांना ताब्यात घेऊन चौकशी करणे व त्यांच्या घराची झडती घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुंडाविरोधी पथकाने बाळू भोकरेच्या गणेशनगरमधील घरावर छापा टाकून झडती घेतली. बाळू घरात नव्हता. त्याचा भाचा धीरज आयरे सापडला. आयरेसह बाळू भोकरे, धीरज कोळेकर, अक्षय शिंदे या चौघांविरुद्ध तीन महिन्यांपूर्वी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तलवारीच्या धाकाने त्याने गणेशनगरमध्ये एका तरुणास खंडणीची मागणी करुन त्यास मारहाण केली होती. याप्रकरणी धीरज कोळेकरला अटक झाली आहे. पण बाळू भोकरेसह तिघे गुंगारा देत फरारी आहेत. आयरे सापडल्याने त्याला पुढील तपासासाठी शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.बाळू भोकरे मध्यरात्री घरी येईल, असा अंदाज करुन पथक पहाटेपर्यंत त्याच्या घराजवळ तळ ठोकून होते. पण तो आलाच नाही. सहायक पोलीस निरीक्षक संतोष डोके, सहायक फौजदार लक्ष्मण मोरे, महेश आवळे, शंकर पाटील, मेघराज रुपनर, योगेश खराडे, संकेत कानडे, आर्यन देशिंगकर, मोतीराम खोत यांच्या पथकाने ही कारवाई केली.शहर पोलीस वादाच्या भोवऱ्यातशहर पोलीस गेल्या काही दिवसात चांगलेच वादाच्या भोवºयात सापडले आहेत. चोरट्यांना पकडून दिले, तर कोणतीही चौकशी न करता सोडून देत आहेत. पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर टिळक चौकात तरुणांचे टोळके रस्त्यावर वाढदिवस साजरा करीत हुल्लडबाजी करीत आहेत. या तरुणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पकडत आहेत. रेकॉर्डवरील गुंड बाळू भोकरे व त्याचे साथीदार खंडणीच्या गुन्ह्यात फरारी आहेत. बाळूचा भाचा आयरे यास गुंडाविरोधी पथकाने पकडले. शहर पोलिसांना तो सापडला नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
गुंड बाळू भोकरेच्या घरावर छापा, सांगलीत कारवाई : भाच्याला अटक; खंडणीच्या गुन्ह्यात गुंगारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 23:37 IST