खानापूर नगरपंचायतीची पाच वर्षांपूर्वी नव्याने स्थापना झाली. पहिल्याच निवडणुकीत तीनही पॅनेलना समान जागा मिळाल्याने त्रिशंकू अवस्था निर्माण झाली.
निवडणूक मतदान आणि नगराध्यक्ष निवड यामध्ये एक महिना अवधी होता. या दरम्यान संभाव्य युतीबाबत अनेक अंदाज वर्तविण्यात येत होते. परंतु अखेरीस एका समान कार्यक्रमावर आधारित एकत्रित येत काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास शिंदे व शिवसेना आमदार अनिल बाबर समर्थकांनी सत्ता स्थापन केली. आधीच्या ग्रामपंचायतीत नेहमी सत्तेत असलेल्या माने गटास विरोधी बाकावर बसावे लागले.
शिंदे-बाबर गटाच्या युतीने खानापूर घाटमाथ्यावरील समीकरणे बदलली गेली. अनेकांची नाराजी सहन करत शिंदे यांच्या खानापूर विकास आघाडी, बाबर समर्थकांच्या जनता विकास आघाडीने एकत्र येऊन खानापूर जनता विकास आघाडी स्थापन केली. अपूर्ण विकासकामे वेगाने पूर्ण करण्याचा झपाटा लावला. यामुळे गेल्या साडेचार वर्षांत अनेक प्रलंबित कामे पूर्ण झाली.
सत्ताधारी गटाने शहरात विकासकामांचा डोंगर उभा केला आहे, तरीही काहींचा विरोध कायम आहे. विकासकामापेक्षा इतर भावनिक मुद्दे पुढे करून सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरू आहे.
यातूनच प्रत्येक पक्ष स्वबळावर लढण्याचा मन:स्थितीत आहे.
कमी मतदारांचे प्रभाग असल्याने व मागील निवडणुकीचा अभ्यास असल्याने तरुण इच्छुकांची संख्या वाढत आहे.
मागील निवडणुकीसाठी ‘एक प्रभाग, एक उमेदवार’ अशा पद्धतीने प्रभाग रचना झाली आहे. या वेळी तशाच प्रकारे निवडणूक होणार असल्याने प्रभाग रचना आहे तशीच राहण्याची शक्यता आहे.
चौकट
पाच कोटींची बक्षिसे
खानापूर नगरपंचायतीने स्वच्छ सर्वेक्षणात सहभागी होऊन देश पातळीवर तसेच राज्य पातळीवरील स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला व पाच कोटींची बक्षिसे मिळविली. शिवाय कोट्यवधींची विकासकामे उभारल्याचा दावा केला आहे.