दत्ता पाटील -- तासगाव तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकाचे महिन्याभरात धूमशान सुरू होणार आहे. तालुक्यावर वर्चस्व मिळवण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीत या निवडणुकीच्यानिमित्ताने जोरदार चुरस होणार, हे स्पष्ट आहे. मात्र या ग्रामपंचायतीत खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघात समावेश असणाऱ्या मांजर्डे-विसापूर सर्कलमधील १६ गावांचा समावेश आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीची पेरणी करण्यासाठी खानापूर-आटपाडीतील नेत्यांनीही या ग्रामपंचायती ‘लक्ष्य’ केलेल्या आहेत. या निमित्ताने तालुक्यात आमदार अनिल बाबर, माजी आमदार सदाशिवराव पाटील, गोपीचंद पडळकर यांचा संपर्क वाढला आहे.तासगाव बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला मिळालेले वर्चस्व भाजपच्या अस्तित्वाला धक्का देणारे ठरले. खासदार संजयकाका पाटील यांनी तासगाव नगरपालिकेतील राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांना भाजपमध्ये प्रवेश देऊन नगरपालिकेचे सत्तास्थान भाजपच्या ताब्यात घेतले. आता तालुक्यातील सर्वाधिक ३९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका आॅक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तालुक्यातील राजकारण दिवसेंदिवस तापत चालले आहे. खासदार संजयकाका पाटील यांनी विकासकामांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने ३९ गावांचा दौरा केला, तर आमदार सुमनताई पाटील यांनीही विकासकामांचे उद्घाटन करण्यास सुरुवात केली आहे.राष्ट्रवादीला या निवडणुकांत आर. आर. पाटील यांची पोकळी जाणवणार आहे. त्यामुळे नेत्यांची भिस्त बाजार समितीच्या निवडणुकीप्रमाणेच कार्यकर्त्यांवरच राहणार आहे. भाजपकडे तगड्या कार्यकर्त्यांची फळी कमकुवत असल्याने स्वत: खासदार संजयकाका आतापासूनच ग्रामपंचायतींच्या मैदानात उरतले आहेत.निवडणूक होणाऱ्या ३९ ग्रामपंचायतींपैकी खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघातील १६ गावांचा समावेश आहे. खानापूर-आटपाडीचा आमदार ठरवण्यात मांजडे-विसापूर सर्कलमधील २१ गावे नेहमीच निर्णायक ठरलेली आहेत. त्यामुळे या १६ गावांकडे शिवसेनेचे आमदार अनिल बाबर, माजी आमदार सदाशिवराव पाटील, भाजपचे गोपीचंद पडळकर यांनीही लक्ष केंद्रीत केले आहे. भाजपचे गोपीचंद पडळकर खासदारांबरोबर राहणार हे निश्चित आहे. मात्र आमदार अनिल बाबर, माजी आमदार सदाशिवराव पाटील हे स्वतंत्र पॅनेल उभा करून आव्हान देणार की केवळ पाठिंब्याचे धोरण स्वीकारणार, याचीही उत्सुकता दिसून येत आहे. आजी, माजी आमदारांकडे लक्ष आमदार अनिल बाबर यांचे आर. आर. आबांशी, तर माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचे खासदार संजयकाकांशी जवळचे संबंध होते. मागील विधानसभा निवडणुकीचा अपवाद वगळता, विसापूर सर्कलमधील २१ गावांतील आबा गटाच्या कार्यकर्त्यांनी अनिल बाबर यांना, तर काका गटाने सदाशिवराव पाटील यांना रसद पुरवली होती. मात्र गतवर्षीच्या अनिल बाबर शिवसेनेतून आमदार झाले, तर संजयकाका भाजपमधून खासदार झाले आहेत. त्यामुळे माजी आमदार सदाशिवराव पाटील खासदारांच्या गटाला रसद देणार, की काँग्रेसच्या माध्यमातून आव्हान निर्माण करणार, याची उत्सुकता आहे. तसेच आमदार अनिल बाबर आबा गटाला पाठबळ देणार, की शिवसेनेच्या माध्यमातून ग्रामपंचायत निवडणुकीत उतरणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.
‘खानापूर’च्या नेत्यांचे लक्ष्य ‘विसापूर’
By admin | Updated: September 21, 2015 00:04 IST