आटपाडी : ‘काळं धन हाकललं, हाकलूनसुद्धा जाईना अन् हजाराच्या नोटंला कुत्रंसुद्धा खाईना’ असं सद्य:स्थितीचं वास्तव चित्रण कवितेतून सादर करून कवी शिवाजी सातपुते यांनी रसिकांची मने जिंंकली. श्री उत्तरेश्वर देवस्थान यात्रेनिमित्त आटपाडीच्या शुक्र ओढ्याच्या काठावर गुलाबी थंडीतही तीन तास कविसंमेलन रंगले. या कविसंमेलनात मोदी सरकारने हजार व पाचशेच्या नोटांवर घातलेल्या बंदीसंदर्भात निमंत्रित कवींनी आपल्या रचना सादर केल्या. या कवितांना रसिकांनी भरभरून दाद देत, थंडीतही टाळ्यांचा कडकडाट करत वातावरण गरम केले. ज्येष्ठ कवी सुधीर इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कविसंमेलनात वीसहून अधिक कवी व शाहिरांनी सहभाग नोंदवत बहारदार कविता सादर केल्या. कविसंमेलनाचे उद्घाटन कृषी उत्पन बाजार समितीचे संचालक पंढरीनाथ नागणे यांनी श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांच्या प्रतिमा पूजनाने केले. व्यासपीठावर बाबासाहेब माळी, दिलीप माळी, यु. टी. जाधव, अजयकुमार भिंंगे, शशिकांत सागर, सतीश भिंंगे उपस्थित होते. माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी कार्यकर्त्यांसह रसिकांमध्ये बसून काव्यमैफलीचा आनंद घेतला. या कविसंमेलनात माणदेशी मंगळवेढ्याचे कवी शिवाजी सातपुते यांनी ‘दाढीवाले, तुमच्यासाठी काय पण’, अशा राजकीय भाष्य करणाऱ्या कविता सादर केल्या. सांगोल्याचे कवी शिवाजी बंडगर यांनी ‘कवा तुला कळायचं, चावडीच्या कट्ट्यावर’ आणि वेड लावणी माणदेशी बोलीभाषेत सादर करून रसिकांना खळखळून हसवले. ज्ञानेश डोंगरे यांनी सादर केलेले विठ्ठला हे भक्तिगीत, लेकींची कविता आणि त्यांच्या हुरडा या लावणीला जोरदार प्रतिसाद मिळाला. कविसंमेलनाचे अध्यक्ष सुधीर इनामदार यांनी नेमक्या शब्दात भोवतालच्या परिस्थितीचा उल्लेख आपल्या कवितांमधून मांडला. प्रा. विजय शिंंदे यांनी प्रास्ताविक केले. शेवटच्या सत्रामध्ये जीवन सावंत यांचे कथाकथन झाले. (वार्ताहर)
आटपाडीच्या यात्रेत रंगले कविसंमेलन
By admin | Updated: November 18, 2016 00:01 IST