सांगली : घर व जमिनीच्या वादातून वसगडे (ता. पलूस) येथील प्रशांत आदगोंडा पाटील (वय २७) या तरुणाचा खून केल्याप्रकरणी एका अल्पवयीन तरुणास अटक करण्यात आली आहे. तर या प्रकरणातील मुख्य संशयित तेजस देवगोंडा पाटील (वय १८) यास न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास बिसूर ते खोतवाडीच्या दरम्यान संशयितांनी लोखंडी गजाने वार करून प्रशांतचा निर्घृण खून केला होता.
वसगडे येथील प्रशांत पाटील हा एका पतसंस्थेत कवलापूर शाखेत कार्यरत होता. गुरुवारी दुपारी तो पतसंस्थेतील काम आवरून घरी जात असताना, बिसूरच्या पुढे व खोतवाडीच्या अलीकडे रस्त्यावरच संशयित तेजस पाटील व त्याच्या मित्राने प्रशांत लोखंडी गज, दगड, चाकूने वार करून त्याचा खून केला होता. याप्रकरणी संशयित तेजस हा भिलवडी पोलिसांत हजर झाला होता. त्यास नंतर सांगली ग्रामीण पोलिसांकडे वर्ग करण्यात आले तर त्याच्या मदतीला असणाऱ्या एका अल्पवयीन तरुणासही ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी संशयित तेजस यास न्यायालयात हजर केले असता त्यास चार दिवसांची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली.