लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : प्रशासनाशी योग्य समन्वय राखून गृहविलगीकरणातील, रुग्णालयातील रुग्णांना शक्य तेवढी मदत करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांच्या संयुक्त गटांची स्थापना करण्याचा निर्णय रविवारी बैठकीत घेण्यात आला.
आरोग्यविश्व कोविड सेंटर येथे स्वामी विवेकानंद कोविड केअर सेंटर, डॉ. पतंगराव कदम कोविड केअर सेंटर, नमरा फाउंडेशन, कोरोना रुग्ण साहाय्य व समन्वय समिती यांची संयुक्त बैठक पार पडली.
सर्व संघटनांनी मिळून एकमेकांना सहकार्य करण्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले. जे रुग्ण गृहविलगीकरणात आहेत, त्यांना हेल्पलाइनद्वारे उपचारासाठी मार्गदर्शन करणे, वेळीच एचआरसीटी, इतर चाचण्या करणे, योग्य औषधोपचार तात्काळ घेण्यासाठी हे मार्गदर्शन असणार आहे. सध्या जे पॉझिटिव्ह अपडेट येतात ते तीन ते चार दिवसांपूर्वीचे येतात. रोजच्या रोज पॉझिटिव्ह रुग्णांची यादी अपडेट करणे, समुपदेशन सेंटर सुरू करणे, याबाबतही पाऊल उचलण्याचा निर्धार करण्यात आला. प्राथमिक अवस्थेत योग्य उपचार झाल्यास पुढील ज्यादाचे खर्चिक उपचार थांबणार आहेत. त्याचबरोबर कोविड सेंटरवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे याप्रश्नी प्रशासनशी समन्वय साधून अडचणींवर मार्ग काढण्याचा व सर्व कोविडमध्ये काम करणाऱ्यांचा संयुक्त ग्रुप तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी नगरसेवक संतोष पाटील, अभिजित भोसले, मंगेश चव्हाण, सतीश साखळकर, डॉ. चितळे, माधव कुलकर्णी, अभिजित शिंदे, विकास कुलकर्णी, अविनाश जाधव, धनंजय वाघ, किशोर लाटणे, संतोष खेत्रे व सिंधी समाजाचे साधक उपस्थित होते.