सांगली : गेल्या तीन दिवसांपासून वळवाच्या पावसाने उघडीप दिली असली तरी पाऊस पुन्हा १४ मे पासून परतणार आहे. त्यानंतर सलग पाच दिवस त्याचा जिल्ह्यात मुक्काम असेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वळवाच्या पावसाने हजेरी लावली होती. जिल्ह्याच्या अनेक भागांत वादळी पावसाने शेतीचे नुकसानही केले. गेल्या तीन दिवसांपासून पावसाने जिल्ह्यातील अनेक भागांतून उघडीप दिली असली तरी आता पुन्हा तो सक्रिय होणार आहे. येत्या १४ ते १८ मे या काळात वळवाचा पाऊस बरसणार आहे. १४ व १५ मे रोजी ढगांची दाटी व काही ठिकाणी तुरळक पाऊस पडणार आहे. १६ मे रोजी ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची चिन्हे आहेत. १७ व १८ मे रोजी पुन्हा वादळी पावसाची शक्यता आहे.
या काळात तापमानात काहीअंशी घट होण्याचा अंदाज आहे. बुधवारी जिल्ह्याचे कमाल तापमान ३७.४, तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस नोंदले गेले. वळवाच्या पावसाची हजेरी लागणार असल्याने या काळात कमाल तापमानात घट होण्याची शक्यता असून, किमान तापमान २३ किंवा २४ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.