पोलिसांची कारवाई वेळोवेळी होत असते. तरीही भाजीपाला विक्रेते आणि ग्राहक रस्त्यावर गर्दी करतात.
अशोक पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : एकीकडे पालकमंत्री जयंत पाटील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बैठका घेत आहेत. माणुसकीचे नाते या ग्रुपने सामाजिक बांधिलकीचे भान राखून कोरोनाच्या संकटातही रक्तदानाचे रेकॉर्ड ब्रेक केले आहे. दुसरीकडे शहरासह ग्रामीण भागातील नागरिक मात्र भाजीपाला व इतर खरेदीसाठी खुलेआम रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. जास्त करून पालिका प्रशासन आणि पोलिसांकडून भाजी विक्रेत्यांचे नियोजन न केल्याने रस्त्यावरील गर्दी हटण्याची चिन्हे दिसेनात.
पालकमंत्री जयंत पाटील यांनी शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत, तलाठी, ग्रामसेवक आणि लोकप्रतिनिधी यांनी आपल्या गावात प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी प्रयत्न करावेत, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्याचाही इशारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर इस्लामपूर पालिकेचे मुख्याधिकारी अरविंद माळी, पोलीस ठाण्याचे निरीक्षक नारायण देशमुख यांनी रस्त्यावरील गर्दी हटविण्यासाठी वेळोवेळी कारवाई करूनही सकाळी ७ ते ११ च्या दरम्यान भाजीपाला आणि इतर खरेदीसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. याबाबत पोलीस यंत्रणा जुजबी कारवाई करण्यापलीकडे काहीही करीत नाही. त्यांनी भाजी विक्रेते पुन्हा रस्त्यावर येऊन आपला बाजार मांडत असल्याने याठिकाणी ग्राहकांची गर्दी होत आहे. त्यातच संशयित कोरोनाचे रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याने तेही रुग्ण खुलेआम वावरताना दिसतात. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यापेक्षा वाढतच चालला आहे.
चौकट
हॉट स्पॉट चौक
शहरातील बसस्थानक रस्ता ते आझाद चौकदरम्यान भाजीपाला, औषधे व इतर साहित्याची दुकाने, आझाद चौक ते गांधी चौक यादरम्यान दारू पार्सल, इतर साहित्य, रुग्णालये, गांधी चौक ते यल्लम्मा चौक यादरम्यान सर्व प्रकारची दुकाने, यल्लम्मा चौक ते मामलेदार कचेरी, फळभाजी विक्रेते, वाळवा बझारपासून बहे रोडवर भाजीपाला विक्रेत्यांची रेलचेल आणि शिराळा नाका परिसर आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असून, ही ठिकाणे सकाळी ७ ते ११ पर्यंत कोरोनाचा हॉट स्पॉट बनत आहेत.