अशोक पाटील -- इस्लामपूर पालिकेत माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांची एकहाती सत्ता आहे. राष्ट्रवादीतील अंतर्गत मतभेदाचा फटका त्यांना कधीच बसलेला नाही. सत्ताधाऱ्यांविरोधात अनेकवेळा आघाड्या झाल्या. मात्र निवडणुकीपुरते एकत्र येऊन गोळाबेरीज करणाऱ्या विरोधकांची बेरीज नेहमीच वजा राहिली आहे. आगामी काळातही इस्लामपुरात राष्ट्रवादीला आव्हान देणाऱ्या विरोधकांची दमछाक होणार असल्याचे चित्र आहे.काँग्रेसचे वैभव पवार, त्यांचे बंधू विजय पवार, भाजपचे बाबासाहेब सूर्यवंशी, विक्रमभाऊ पाटील, विजय कुंभार, शिवसेनेचे आनंदराव पवार, महाडिक गटाचे राहुल महाडिक, सम्राट महाडिक आणि त्यांचे कार्यकर्ते आमदार पाटील यांना नेहमीच विरोध करत आले आहेत, परंतु भक्कम नेतृत्वाअभावी त्यांचे आव्हान नेहमीच तुटपुंजे ठरत आले आहे.भाजपचे बाबासाहेब सूर्यवंशी सत्ताधाऱ्यांविरोधात प्रामाणिकपणे लढा दिल्याचा दावा करत आहेत. एकाकी लढणाऱ्या सूर्यवंशी यांचा आवाज दाबण्यात राष्ट्रवादीतील काही नेत्यांना यश आले आहे. परंतु येणाऱ्या काळात हा प्रामाणिकपणा जनतेपुढे येईल, तेव्हाच आपण बोलू, अशी भूमिका सूर्यवंशी यांनी घेतली आहे.विक्रमभाऊ पाटील हे तर आपणच भाजपचे नेते असल्याचे सांगतात. कोणतीही तडजोड करण्यास ते तयार नाहीत. येणाऱ्या काळात भाजपच्या ताकदीवर सत्ताधाऱ्यांतील काही मासे गळाला लावू, असा दावा त्यांनी केला आहे. बाहेरची ताकद न घेता विरोधी गट भक्कम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.विरोधी नगरसेवक आनंदराव पवार, कपिल ओसवाल यांना पालिकेतील प्रशासनाचा आणि कारभाराचा अभ्यास नाही. त्यामुळे विरोधी गटाची जबाबदारी भाजपचे विजय कुंभार यांच्यावर आली आहे. ते फक्त कागदोपत्री लढाया करत आहेत. त्यांना इतर कोणाचीही साथ मिळत नसल्याने सत्ताधाऱ्यांनी ‘हम करेसो कायदा’ असा कारभार सुरू ठेवला आहे.गत नगरपालिका निवडणुकीत विरोधकांनी मोट बांधली होती. मात्र ऐनवेळी मीपणा मध्ये आल्याने पदरात पडणाऱ्या आठ ते १० जागा गमावल्या. तेव्हापासून आजतागायत विरोधकांना उभारी घेता आली नाही. तथापि पेठनाक्यावरील महाडिक गटाची हवा कायम आहे. आगामी काळात विरोधक एकत्र न आल्यास आम्ही स्वत:चे वेगळे पॅनेल करू, असा इशारा जि. प. सदस्य सम्राट महाडिक यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला.गत निवडणुकीत विरोधकांतील अंतर्गत गटबाजीमुळे चटके बसले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी पुन्हा एकदा विरोधकांची मोट बांधण्याचे काम करावे लागणार आहे. इस्लामपूर येथे आमचे मतदान आहे. त्यामुळे विरोधी गट भक्कम करणे हे आमचे कर्तव्यच आहे.- सम्राट महाडिक, जि. प. सदस्य
इस्लामपुरात विरोधकांच्या बेरजेत वजाबाकीच जास्त
By admin | Updated: November 25, 2015 00:33 IST