जयंतरावांना निमंत्रण; काँग्रेसमध्ये मतभेद : जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 11:34 PM2018-05-28T23:34:51+5:302018-05-28T23:34:51+5:30

सांगली : महापालिकेच्या ७० एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राच्या उद््घाटनाचे ग्रहण अद्यापही सुटलेले नाही. सध्या या प्रकल्पाचे उद्घाटन लांबणीवर गेले असले तरी, उद्घाटनाच्या मानसन्मानाचे कवित्व

 Invite to Jayantrao; Differences in Congress: Inauguration of Water Purification Center | जयंतरावांना निमंत्रण; काँग्रेसमध्ये मतभेद : जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन

जयंतरावांना निमंत्रण; काँग्रेसमध्ये मतभेद : जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन

Next
ठळक मुद्देकार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा प्रतीक पाटील यांचा इशारा

सांगली : महापालिकेच्या ७० एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राच्या उद््घाटनाचे ग्रहण अद्यापही सुटलेले नाही. सध्या या प्रकल्पाचे उद्घाटन लांबणीवर गेले असले तरी, उद्घाटनाच्या मानसन्मानाचे कवित्व संपलेले नाही. सत्ताधारी विरूद्ध प्रशासनाचा संघर्ष संपता संपता आता काँग्रेसमध्येच मतभेद निर्माण झाले आहे. उद्घाटनाला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांना निमंत्रण देण्यास माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी विरोध केला आहे. प्रसंगी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा इशाराही दिला आहे.

महापालिकेच्या ७० एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राचे उद््घाटन रविवारी होणार होते. पण शनिवारी ड्रेनेज प्रकल्पात पडून दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याने सत्ताधारी काँग्रेसने उद््घाटन कार्यक्रम पुढे ढकलला आहे. येत्या चार दिवसात हा कार्यक्रम होण्याची चिन्हे आहेत. या प्रकल्पाला सुरूवातीपासूनच ग्रहण लागले आहे. वर्षभरापूर्वी हा प्रकल्प पूर्ण होणार होता. खुद्द महापौर व आयुक्तांनी तसे जाहीर केले होते. पण वर्षभरानंतर प्रकल्प कार्यान्वित झाला. त्यात उद््घाटनाला कोणाला निमंत्रण द्यायचे, यावरून सत्ताधारी व प्रशासनात वाद निर्माण झाला.

सुरूवातीला काँग्रेसने या प्रकल्पाच्या उद््घाटनाच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी चालविली होती. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याहस्ते उद्घाटन करण्याचा निर्णयही झाला. पण नंतर प्रशासनाने शासनाचा निधी असल्याचे कारण पुढे करीत, निमंत्रण पत्रिकेत भाजप नेत्यांचाही समावेश करण्याची अट घातली. मग काँग्रेसने नवी चाल खेळत या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांना दिले. पहिल्या पत्रिकेत भाजपचे खासदार, आमदारांचा समावेश झाला. नंतर पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या नावाचा समावेश करीत नव्याने पत्रिका छापण्यात आल्या. सत्ताधारी व प्रशासनाच्या कुरघोड्या शेवटच्या क्षणापर्यंत सुरूच होत्या. पण दुर्दैवाने हा कार्यक्रमच रद्द करावा लागला.

त्यात काँग्रेसचे प्रतीक पाटील यांनी जयंत पाटील यांना निमंत्रण दिल्याच्या कारणावरून नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, सांगली व कुपवाडकरांना शुध्द व मुबलक पाणी मिळण्यासाठी मदनभाऊ पाटील यांनी वारणा योजनेचा संकल्प केला होता. आपण खासदार असताना या योजनेचा पाठपुरावा केला. त्या प्रयत्नामुळे वारणा योजना मंजूर झाली. मात्र महापालिकेत २००८ मध्ये सत्तांतर झाले, महाआघाडीची सत्ता आली. मदनभाऊंचे वारणा योजनेचे स्वप्न राष्ट्रवादीच्या याच नेत्याने भंग केले. वारणेचा प्रस्ताव गुंडाळला. त्याच राष्ट्रवादीच्या नेत्याला आता जलशुध्दीकरण केंद्राच्या लोकार्पण सोहळ्यासाठी निमंत्रित केले गेले. त्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी पसरली असल्याचा दावा प्रतीक पाटील यांनी केला आहे. दुसरीकडे पालिकेतील सत्ताधारी काँग्रेसचे पदाधिकारी मात्र जयंत पाटील यांना बोलाविण्यावर ठाम आहेत.

सध्या या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा लांबणीवर गेला आहे. येत्या आठवडाभरात उद््घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. तेव्हा जयंत पाटील विरूद्ध प्रतीक पाटील असा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.

मदनभाऊ गटाची : विरोधामुळे कोंडी
जयंत पाटील यांच्या उपस्थितीला प्रतीक पाटील यांनी विरोध केला आहे. यापूर्वीही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीबाबत त्यांचे बंधू विशाल पाटील यांनी जाहीर सभेतून टीकास्त्र सोडले होते. वसंतदादा घराण्याने जयंत पाटील यांना विरोध कायम ठेवल्याने मदनभाऊ गटाची कोंडी झाली आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर मदनभाऊ व जयंत पाटील हे एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू जिल्हा बँक व मार्केट कमिटीच्या निवडणुकीत एकत्र आले. तेव्हापासून दोघांतील राजकीय संघर्षही संपला होता. मदनभाऊंच्या निधनानंतर जयंतरावांनी महापालिकेच्या राजकारणात त्यांच्या पत्नी जयश्रीताई पाटील यांना पडद्याआडून मदत केली आहे. त्यामुळे मदनभाऊ गटात जयंत पाटीलविरोध संपुष्टात आला आहे. उलट मदनभाऊ गट राष्ट्रवादीशी आघाडी करण्यास इच्छुक आहे. त्यात प्रतीक व विशाल पाटील या दोघांच्या विरोधामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर या गटाची कोंडी झाली आहे.

Web Title:  Invite to Jayantrao; Differences in Congress: Inauguration of Water Purification Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.