सांगली : कडकनाथ कोंबडी पालनातून आर्थिक लाभ मिळवून देण्याच्या आमिषाने झालेल्या फसवणुकीचा तपास जैसे थे आहे. यातील संशयितांना अटक झाली असली तरी शेतकऱ्यांना रक्कम अद्यापही परत न मिळाल्याने अस्वस्थता कायम आहे. कोरोनामुळे थांबलेले आंदोलन आता पुन्हा करण्यात येणार असून, फसवणूक झालेले शेतकरी यासाठी पुढाकार घेणार आहेत.
कडकनाथ कोंबडी पालनातून आर्थिक सुबत्तेचे आमिष दाखवून शेतकऱ्यांना गुंतवणूक करण्यास लावून कंपन्यांनी गाशा गुंडाळल्याने पोल्ट्रीधारकांची अडचण झाली होती. २०१९पासून याबाबत आवाज उठवला जात आहे. यातील काही सूत्रधार सध्या कोठडीत असले तरी शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय अद्यापही झालेला नाही. कडकनाथ कोंबडी पालनातून आर्थिक झळ बसलेल्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कडकनाथ कोंबडी पालक संघर्ष समितीची स्थापना करून लढा उभा केला होता. गेल्यावर्षी कोरोना संसर्ग सुरू झाल्यानंतर मात्र आंदोलन व पाठपुरावाही थांबला होता.
शासनाने एमपीआयडी ॲक्टनुसार या प्रकरणाचे फॉरेन्सिक ऑडिट पूर्ण केले आहे. मात्र, त्याचा अहवाल समोर आलाच नाही. शिवाय या प्रकरणातील संशयितांची संपत्ती जप्त करण्यात आली असली तरी पुढे काय झाले, याचीही माहिती देण्यात आली नसल्याचा गुंतवणूकदारांचा आरोप आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी व जप्त कारवाईसाठी कडेगावच्या प्रांताधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता या अधिकाऱ्यांचीही बदली झाल्याने पुढील तपासाच्या जबाबदारीबाबत कोणतीही निश्चित माहिती दिली जात नसल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास त्याला भरपाई दिली जाते, त्याच धर्तीवर कडकनाथ कोंबडी पालनातून फसवणूक झालेल्यांना मदत द्यावी व आता संपूर्ण पोल्ट्री व्यावसायिकांच्या उन्नतीसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन व्हावे, यासाठी गुंतवणूकदार आंदोलन सुरू करणार आहेत.
चौकट
सहा राज्यांतील चार हजारांवर शेतकरी भरडले
प्रत्यक्ष कागदावर हा घोटाळा १०० कोटींच्या आत असला तरी कोंबडी पालनासाठी शेतकऱ्यांनी उभारलेली शेड, केलेली इतर गुंतवणूक यामुळे घोटाळ्याची व्याप्ती वाढून आकडा ६०० कोटींवर जात आहे. यात सहा राज्यांतील चार हजारांवर शेतकरी भरडले गेले आहेत.
कोट
कडकनाथ कोंबडी पालन घोटाळ्यातील मुख्य सूत्रधाराला अटक व्हावी, यावर आम्ही ठाम आहोत. मात्र, यापूर्वीच्या भाजपच्या व आताच्या महाविकास आघाडीच्या सरकारला याचे गांभीर्य नसल्याने गुंतवणूकदारांत अस्वस्थता आहे. त्यामुळेच आता पुन्हा आंदोलन उभारले जाणार आहे.
- दिग्विजय पाटील, निमंत्रण, कडकनाथ कोंबडी पालक संघर्ष समिती