सांगली : महिला बदली कामगाराने शहर पोलीस ठाण्यासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी आयुक्त नितीन कापडणीस यांनी गंभीर दखल घेत महापालिकेच्या विशाखा समितीला तात्काळ चौकशीचे आदेश दिले. चौकशी अहवालानंतर दोषींवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
काम देण्यासाठी पैशाची मागणी, पैसे न दिल्यास कामावरून काढून टाकण्याची धमकी, विनयभंग याबाबत महापालिकेच्या एका महिला बदली कामगाराने शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. दरम्यान संबंधित मुकादमानेही संबंधित महिला बदली कामगाराविरोधात पोलिसांत तक्रार अर्ज दिला होता. त्यानंतर संबंधित महिला बदली कामगार यांनी शहर पोलीस ठाण्यासमोर विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी आयुक्त नितीन कापडणीस म्हणाले, या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. विशाखा समितीला तात्काळ चौकशीचे आदेश देत आहे.