शाळांकडून शुल्क वसुलीत दुजाभाव
सांगली : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षात शाळाच सुरू झाल्या नाहीत, पण खासगी शाळांकडून विद्यार्थ्यांच्या पालकांकडून शुल्क वसुली जोमात केली आहे. काही पालकांना शुल्क वसुलीत १५ टक्के तर काहींना ५० टक्क्यांपर्यंत सवलत दिली आहे. यामुळे पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण झाले आहे. खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील या प्रकाराबद्दल पालकांनी माध्यमिक शिक्षण विभागाकडे तक्रार दाखल केली आहे.
सांगली जिल्ह्यात बससेवा सुरळीत
सांगली : प्रवाशांची गरज लक्षात घेऊन, एसटी महामंडळाच्या सांगली विभागाने जिल्ह्यातील अनेक मार्गांवर बसेस सोडल्या आहेत. जवळपास ५० टक्के बसेस सुरू केल्या आहेत. लांब पल्ल्याच्या बसेसही सुरू केल्यामुळे अनेक प्रवाशांची गैरसोय टळली आहे, तसेच एसटीच्या उत्पन्नातही मोठ्या प्रमाणात भर पडल्याचे दिसून येत आहे.
पालेभाज्यांची आवक वाढली
सांगली : लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचा भाजीपाला सांगलीमध्ये सौद्यात येऊ लागला आहे. भाजीपाल्यांची आवक वाढल्यामुळे दरही कमी झाले आहेत. ग्राहकांची सोय झाली आहे, पण पालेभाज्यांचे दर कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.