सांगली : विश्रामबाग येथील डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये चुकून गोळीबार झाल्याने दीपक सदाशिव हेगडे (वय ३९, रा. वारणाली, विश्रामबाग, सांगली) हे जखमी झाले आहेत. शनिवारी रात्री साडेनऊ वाजता ही घटना घडली. याबाबत विश्रामबाग पोलिसात नोंद आहे. दीपक हेगडे हे रात्री विश्रामबागमधील एका डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये बाजार करण्यासाठी गेले होते, त्याचवेळी सुरेश कृष्णा गायकवाड (वय ४०, रा. वानलेसवाडी) हे पत्नीसह बाजार करण्यासाठी आले होते. हे दोघेही बाजार केल्यानंतर बिल देण्यासाठी काऊंटरवर गेले. गायकवाड यांच्याकडे परवानाधारक रिव्हॉल्व्हर आहे. ते त्यांनी कमरेला लावले होते, पण ते लॉक केले नव्हते. बिल देण्याच्या घाईगडबडीत अचानक रिव्हॉल्व्हर त्यांच्या कमरेतून निसटून खाली पडले. त्याचवेळी रिव्हॉल्व्हरमधून गोळी उडाली. ती शेजारीच काऊंटरजवळ बिल देण्यासाठी उभे असलेल्या दीपक हेगडे यांच्या गालाच्या डाव्या बाजूला चाटून गेली. यामध्ये ते जखमी झाले आहेत. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळतात विश्रामबाग पोलिस घटनास्थळी दाखल झाले. (वार्ताहर)
चुकून झालेल्या गोळीबारात वकील जखमी
By admin | Updated: April 3, 2016 03:49 IST