सांगली : महिला पोलीस कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी संशयित असिफ नबीलाला बावा याला मंगळवारी न्यायालयाने आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी मंगळवारी दिली.
शहरातील नळभागातील गरीबनवाज मशिदीसमोर १५ मे रोजी रात्री दोघांचे भांडण सुरू होते. माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याकडील महिला पोलीस तेथे गेल्या होत्या. भांडण सोडविण्याचा प्रयत्न करीत असतानाच असिफ बावा तेथे आला. त्याने संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्याला दमदाटी करीत हुज्जत घातली. जमावातील काहींनी पोलीस महिलेला धक्काबुक्की केली, काहींनी विनयभंगाचा प्रयत्न केला. घटनेबाबत शहर पोलिसांनी बावासह ५० जणांविरोधात विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले होते.
गुन्हा दाखल होताच असिफ बावा पसारच होता. अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर तीन दिवसांपूर्वी तो पोलिसांना शरण आला. त्यावेळी त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मंगळवारी न्यायालयात हजर केले असता आणखी दोन दिवसांची कोठडी सुनावण्यात आल्याचे निरीक्षक सिंदकर यांनी सांगितले.