मिरज : प्रत्येक निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला आव्हान देणाऱ्या मिरज पॅटर्नमधील नेत्यांनी आता महापालिका निवडणुकीपूर्वी आघाडी पॅटर्न सुरु केला आहे. माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांची मिरज स्वाभिमानी आघाडी, ज्येष्ठ नेते सुरेश आवटी यांची जनसंघर्ष विकास आघाडी खरोखरच आगामी निवडणूक लढविणार की पक्षनेत्यांवर दबाव म्हणून या आघाड्यांचा खटाटोप सुरु आहे याचे कुतूहल आहे.मिरज पॅटर्नमध्ये मिरजेतील सर्व पक्षांतील नेते आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत स्वपक्षाच्या उमेदवाराऐवजी मिरज पॅटर्न ठरवेल त्या उमेदवाराच्या पाठीशी मिरजेतील कारभारी राहिले आहेत. महापालिकेचा कारभार नेहमी मिरजेतीलच नेत्यांकडे ठेवण्यात मिरज पॅटर्नला यश आले होते. महापालिकेत यापूर्वी दिवंगत माजी मंत्री मदन पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली. मात्र त्यावेळी मिरज संघर्ष समितीने राष्ट्रवादीला समर्थन दिले होते. त्यानंतर काँग्रेस वगळून माजी मंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय विकास महाआघाडी सत्तेवर आली. पुढील निवडणुकीत मिरज पॅटर्नमधील नेत्यांनी माजी मंत्री जयंत पाटील यांचे नेतृत्व झुगारून, पुन्हा माजी मंत्री मदन पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाला मदत केली. त्यानंतरच्या निवडणुकीत मिरज पॅटर्नमधील नेते भाजपासोबत गेले. महापालिकेत भाजपची सत्ता आली. आता यावेळी मिरज पॅटर्नमधील नेत्यांचा वेगळा विचार सुरु आहे. माजी खासदार संजय पाटील यांच्या दोन निवडणुकीत मिरज पॅटर्नमधील नेते त्यांच्यासोबत होते. यावेळी मिरज पॅटर्नमधील नेत्यांनी लोकसभेला खासदार विशाल पाटील यांना पाठिंबा व विधानसभा निवडणुकीत सुरेश खाडे यांना साथ दिली. आता महापालिका निवडणुकीसाठी स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी आहे. यासाठी मिरज पॅटर्न गुंडाळून यावेळी स्वतंत्र आघाड्यांची नोंदणी केली आहे. सर्वच पक्षांना यापूर्वी मिरज पॅटर्नचा फटका बसल्याने, वरिष्ठ पक्षनेत्यांनी उमेदवारी वाटपाबाबत सावध पवित्रा घेतला आहे. त्यामुळे मिरजेतील कारभारी मंडळींनी स्वतःसाठी व समर्थकांसाठी आघाडीची मोर्चेबांधणी केली आहे. राष्ट्रवादी नेते माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांची मिरज स्वाभिमानी आघाडी, भाजप नेते सुरेश आवटी यांची जनसंघर्ष विकास आघाडी त्यांच्या पक्षावर दबाव आणण्याच्या प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. खासदारांच्या सर्वपक्षीय समर्थकांची वसंतदादा आघाडीही निवडणूक रिंगणात उतरणार आहे. केवळ महापालिकाच नाही तर मिरज पूर्व भागातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांतही आघाड्यामार्फत लढण्याची तयारी सुरु आहे.नेत्यांचे चर्चेचे गुऱ्हाळ सुरूसुरेश आवटी यांच्यामागे बारा माजी नगरसेवक असल्याचे सांगितले जात आहे. माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांच्या सोबतही चार माजी नगरसेवक आहेत. सध्या या नेत्यांचे आपल्या पक्षाबरोबर चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. मात्र अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत तर त्यांच्याकडे आघाडीचा पर्याय आहे. आतापर्यंत सत्ताधारी पक्षाला मिरज पॅटर्नने फटका दिला आहे. मात्र यावेळी महायुती व विरोधी महाआघाडीसमोर मिरजेत वेगवेगळ्या आघाड्या करून निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या या नव्या आघाडी पॅटर्नचे आव्हान आहे.
Web Summary : Miraj leaders, known for challenging ruling parties, are forming independent fronts before the municipal elections. These fronts, led by Bagwan and Awati, aim to secure positions for themselves and their supporters, creating a challenge for established parties.
Web Summary : मिराज के नेता, जो सत्ताधारी दलों को चुनौती देने के लिए जाने जाते हैं, नगरपालिका चुनावों से पहले स्वतंत्र मोर्चे बना रहे हैं। बागवान और आवटी के नेतृत्व वाले इन मोर्चों का उद्देश्य अपने और अपने समर्थकों के लिए पद सुरक्षित करना है, जिससे स्थापित दलों के लिए चुनौती पैदा हो रही है।