सांगली : महापालिका क्षेत्रात एकात्मिक महिला व बालविकास प्रकल्पाअंतर्गत लहान बालकांना व गरोदर मातांना दिला जाणारा आहार निकृष्ट आहे. ग्रामीण भागाप्रमाणे आहार वाटप करावे, अशी मागणी सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने करण्यात आली.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना याबाबतचे निवेदन समितीने दिले. निवेदनात म्हटले आहे की, सांगली मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रात एकात्मिक महिला व बालविकास प्रकल्पाअंतर्गत लहान बालकांना व गरोदर मातांना पोषण आहार वाटप करण्यात येत आहे. त्याचा दर्जा पाहिला, तर जनावरेसुद्धा तो आहार खाणार नाहीत. हलक्या दर्जाचे फूड पॅकेट वाटप करण्यात येत आहेत. त्यांची तपासणी करून संबंधित यंत्रणेवर तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात यावेत.
ग्रामीण भागात ज्यापद्धतीने तांदूळ, गहू, पोषक डाळी, तेल वाटप करण्यात येते, त्याचपद्धतीने महापालिका क्षेत्रातही वाटप करण्यात यावे. अन्यथा आम्हाला बालकांच्या पालकांना बरोबर घेऊन तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे. निवेदनावर माजी आमदार नितीन शिंदे, पृथ्वीराज पवार, सतीश साखळकर, प्रशांत भोसले, महेश खराडे, विकास मगदूम, डॉ. संजय पाटील, कॉ. उमेश देशमुख, आशिष कोरी, तोहीद शेख, वि. द. बर्वे, कॉ. शंकर पुजारी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.