सांगली : जत तालुक्यातील एका गावात मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून करण्यात आला. हे आपल्या समाजाचे अपयश आहे. केंद्रीय अर्थसंकल्प मांडताना तुम्ही महिला सुरक्षेवर काय तरतूद केली आहे? ती आपली जबाबदारी नाही का? असा सवाल खासदार विशाल पाटील संसदेत उपस्थित केला.अर्थसंकल्पावर मत व्यक्त करताना, सांगली आणि पश्चिम महाराष्ट्राचा नामोल्लेख टाळण्याचा अर्थमंत्र्यांनी ‘विक्रम’च केला आहे, अशी विशाल पाटील यांनी टोलेबाजी केली. देशाला सर्वाधिक कर देणाऱ्या महाराष्ट्राच्या विकासासाठी आर्थिक तरतूद करण्यात सरकार मुद्दाम दुर्लक्ष करत आहे. महाराष्ट्राकडे दुर्लक्ष केल्याने भाजपला लोकसभा निवडणुकीत फटका बसला होता. त्यामुळे यावेळी तरी महाराष्ट्रासाठी काही ठोस मिळेल, अशी अपेक्षा होती.सांगलीसारख्या शहरांचा ‘स्मार्ट सिटी’त समावेश, महाराष्ट्रातील विमानतळांची संख्या वाढवणे, सिंचन योजनांसाठी निधी देणे, ‘आयआयटी’, ‘आयआयएम्स’ सुरू करणे, खतांवरील जीएसटी हटवणे, आशा, सेविकांची मानधनवाढ अशा कोणत्याच गोष्टीकडे सरकारने लक्ष दिलेले दिसत नाही.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे काय?भाजपने निवडणुकीपूर्वी तशी घोषणा केली. शेतकरी कर्ज परतफेडीच्या स्थितीत नाहीत. जे परतफेड करू शकतात, तेही आता सरकारच्या फसव्या घोषणात अडकून पडले आहेत. या स्थितीत महाराष्ट्रातील ग्रामीण व्यवस्था पूर्ण ‘व्हेंटिलेटर’वर गेली आहे. अर्थसंकल्पात या विषयावर काहीतरी बोलायले हवे होते. सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आहे की नाही, हे जाहीर करा. देणार नसाल तर घोषणा हा जुमला होता, असे जाहीर करा, असेही विशाल पाटील म्हणाले.
भाजपकडून एकनाथ शिंदे यांची फसवणूकविशाल पाटील म्हणाले, पूर्वी लग्नासाठी एका मुलाचा फोटो दाखवायचा आणि दुसऱ्याबरोबरच लग्न लावून द्यायचे, असा प्रकार होता. महाराष्ट्रात तेच घडले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चेहरा दाखवून निवडणूक जिंकली आणि दुसरेच वरातीच्या घोड्यावर बसले. ‘मॅन ऑफ द मॅच’ला बारावा खेळाडू बनवले आणि बाराच्या खेळाडूला कॅप्टन करून टाकले.