फोटो ओळ : गोंधळेवाडी (ता. जत) येथील श्रीसंत बागडेबाबा यांच्या मंदिर कामाची माजी मंत्री महादेव जानकर यांनी पाहणी केली. यावेळी तुकारामबाबा महाराज उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
संख : तुकाराम बाबांनी म्हैसाळ योजनेच्या पाण्यासाठी काढलेली संख ते मुंबई मंत्रालय पायी दिंडी ही ऐतिहासिक दिंडी होती. तालुक्यात अपघात झाल्यास, दुदैवी घटना घडल्यास श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या माध्यमातून तत्काळ मदत केली जाते. हे मोठे कार्य आहे, असे मत माजी दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केले.
गोंधळेवाडी (ता.जत) येथील चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकारामबाबा महाराज यांच्या हस्ते माजी मंत्री महादेव जानकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
माजी मंत्री महादेव जानकर यांनी गोंधळेवाडी येथील बाबा आश्रमात उभारण्यात येत असलेल्या श्रीसंत बागडेबाबा यांच्या मंदिर कामाची व बाबा जलच्या युनिटची पाहणी केली.
जानकर म्हणाले, कोरोनाच्या संकटात तुकारामबाबा महाराज यांनी मास्क, सॅनिटायझर बरोबरच जीवनावश्यक किट, भाजीपाला वाटप करत जतकरांना मोठा दिलासा दिला आहे. भविष्यातही तुकारामबाबा महाराज यांनी आपले कार्य असेच सुरू ठेवावे. रासप आपणास कायम सहकार्य करेल.
यावेळी अजितकुमार पाटील, आप्पासाहेब थोरात, अखिल नगारजी, अमोल कुलाळ, पांडुरंग धडस, अनिल थोरात उपस्थित होते.