सांगली : दहावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक व करिअरविषयक अद्ययावत मार्गदर्शन मिळावे यासाठी रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० यांच्यावतीने ‘आयडियल स्टडी ॲप’ उपलब्ध करून देण्यात आले आहे.
विद्यार्थी जीवनातील पहिलीच सार्वत्रिक परीक्षा असल्याने दहावीच्या परीक्षेस विशेष महत्त्व आहे. भविष्यातील वाटचाल, दिशा, करिअर दहावीच्या यशावर अवलंबून असते. दहावीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांला यामध्ये उज्ज्वल यश मिळालेच पाहिजे यासाठी प्रत्येक पालक वर्षभर तयारी करीत असतात. प्रत्येक विषयाच्या बोर्डाला येणाऱ्या प्रश्नपत्रिका व दहावी पास झाल्यानंतर लागणारे करिअर मार्गदर्शन यासाठी माेठा खर्च केला जातो. पालकांचा हा सर्व खर्च वाचावा यासाठी विद्यार्थ्यांना उपयुक्त असे ‘आयडियल स्टडी ॲप’ नाममात्र ५० रुपयांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे.
यामध्ये प्रत्येक धड्याच्या नोट्स, स्वाध्यायाची उत्तरे, महत्त्वाचे प्रश्न, एम.सी.क्यू., अक्टिव्हिटी शीट, व्हिडिओ, बोर्डासाठीच्या सराव प्रश्नपत्रिका, तसेच करिअर मार्गदर्शन मिळणार आहे.
हे ॲप दहावी मराठी मेडियम, सेमी इंग्लिश, तसेच इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांना वापरता येणार आहे, असे रोटरी क्लब सांगलीचे ज्येष्ठ सदस्य किशोर लुल्ला यांनी सांगितले.