विटा : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या घरगुती भांडणाच्या रागातून पतीने पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून देत गळ्यावर चाकूने वार केले. यानंतर स्वत:ही कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी पहाटे ३.३० वाजता भूड (ता. खानापूर) येथे घडली. दीपाली रामचंद्र उर्फ संतोष कदम (वय ३४) व रामचंद्र उर्फ संतोष आनंदा कदम (दोघेही रा. भूड) असे या दाम्पत्याचे नाव आहे.
भूड येथील रामचंद्र उर्फ संतोष व त्याची पत्नी दीपाली यांचे गेल्या चार दिवसांपासून घरगुती कारणावरून भांडण सुरु होते. सोमवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास दीपाली ही घरात झोपलेली असताना रामचंद्रने अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिले. तसेच गळ्यावर धारदार चाकूने वार करून तिच्या खुनाचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक अंकुश इंगळे, पोलीस निरीक्षक संतोष डोके, उपनिरीक्षक जालिंदर जाधव, सागर गायकवाड हे घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत संशयित पती रामचंद्र याने घटनास्थळावरून पलायन केले होते. दरम्यान, गंभीर जखमी दीपाली यांना उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेनंतर साेमवारी दुपारी संशयित रामचंद्र यानेही कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यालाही सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद विटा पोलिसात झाली असून, उपनिरीक्षक जालिंदर जाधव पुढील तपास करत आहेत.