संख : जत येथील मनगुळी प्लॉट परिसरात मल्लिकार्जुन रुद्राप्पा होकांडी यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चाेरट्यांनी पाच लाख ३० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. १२ तोळे सोने व रोख दहा हजार रुपये असा ऐवज चोरीस गेला आहे. शनिवारी रात्री ही घटना घडली. याबाबत पोलीस जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
हॉटेल व्यावसायिक असलेले मल्लिकार्जुन होकांडी जत येथील मनगुळी प्लॉट परिसरात कुटुंबासमवेत राहातात. त्यांच्या पत्नीचे चार दिवसांपूर्वी आकस्मिक निधन झाले आहे. घरातील सर्वजण अंत्यविधीसाठी मूळ गावी तावशी (ता. अथणी, जि. बेळगाव) येथे गेले होते. यामुळे त्यांचे मित्र संजय बंडगर दररोज त्यांच्या घरी मुक्कामास जात होते. शनिवारी रात्री ते हाेकांडी यांच्या घरी गेले असता घरास आतून कडी होती. बंडगर यांनी दरवाजा वाजविला; पण आतून प्रत्युत्तर आले नाही. होकांडी कुटुंबीय घरी परतले असावेत, असे समजून बंडगर पुन्हा आपल्या घरी आले. रविवारी सकाळीही त्यांच्या घराचा दरवाजा बंद दिसल्याने बंडगर पाठीमागील बाजूस गेले असता दरवाजा उघडा दिसला. आत जाऊन पाहिले असता कपाट फोडून साहित्य अस्ताव्यस्त टाकलेले दिसले. त्यानी मल्लिकार्जुन यांना फोन करून घटनेची माहिती दिली.
मल्लिकार्जुन यांनी घरी येऊन पाहणी केली असता सहा तोळ्याचे गंठण, एक तोळ्याची चेन, चार तोळ्यांच्या दोन बांगड्या असे १२ ताेळे साेन्याचे दागिने व रोख दहा हजार रुपये नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. घटनेची माहिती जत पाेलिसांना देण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले यांनी घटनास्थळी भेट दिली. जत पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला. सांगलीतून आलेले श्वानपथक घटनास्थळी घुटमळले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके करीत आहेत.
फोटो : ०७ संख ४
ओळ : जत येथील मल्लिकार्जुन होकांडी यांच्या घरातील कपाट तोडून चोरट्यांनी पाच लाख ३० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.