सांगली : वयाची ५८ वर्षे पूर्ण केलेली अनेक सरकारी नोकरदार मंडळी सोमवारी (दि. ३१) सेवानिवृत्त होत आहेत. कोरोना व लॉकडाऊनमुळे कोणताही साग्रसंगीत निरोप समारंभ न होताच ही मंडळी प्रदीर्घ लोकसेवेचा निरोप घेत आहेत.
प्राथमिक शिक्षकांनी हजेरीवर सरसकट १ जून जन्मतारीख नोंदवलेल्या नोकरदारांचा सेवा कालावधी सोमवारी समाप्त होईल, त्यामुळे जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांत उद्या त्यांच्या कामाचा शेवटचा दिवस असेल. जिल्हाधिकारी कार्यालय, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद, एस. टी., कृषी, पाणीपुरवठा, आरोग्य अशा अनेकविध विभागांमधील कर्मचारी सोमवारी निवृत्त होत आहेत. विशेषत: याचा मोठा फटका आरोग्य विभागाला बसणार आहे. कोरोना काळात या विभागावर सर्वाधिक ताण आहे. गेले सव्वा वर्ष कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने कोरोनाशी लढा देण्याचे काम सुरु आहे. आता हक्काचे कायम कर्मचारी निवृत्त होेत असल्याने प्रशासनाला अडथळ्यांचा सामना करावा लागेल. कोरोनासाठी शिक्षण, बांधकाम, कृषी अशा अनेक विभागांमधील कर्मचारी दिमतीला घेतले आहेत. तेदेखील सोमवारी कायमची रजा घेणार असल्याने मनुष्यबळाची चणचण निर्माण होईल.
शासनाने अनेक वर्षांपासून नवी नोकरभरती केलेली नाही, त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळावर कोरोनाशी लढा सुरु होता, तोदेखील आता कठीण होणार आहे. यापूर्वी २८ फेब्रुवारी, ३१ मार्च रोजीही काही कर्मचारी निवृत्त झाले होते, पण त्यांची संख्या कमी असल्याने तीव्रता जाणवली नव्हती. मात्र, ३१ मे रोजी निवृत्त होणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
चौकट
ना फूल, ना फुलाची पाकळी
एकाच खात्यात वर्षानुवर्षे काम केल्याने कर्मचाऱ्यांत स्नेहबंध निर्माण झालेले असतात. निवृत्तीवेळी निरोप देण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात. यंदा मात्र कोणताही जाहीर निरोप न घेता, कर्मचारी शांतपणे घरी जाताना दिसत आहेत. लॉकडाऊनमुळे जाहीर निरोप समारंभ झाले नाहीत. काही कर्मचाऱ्यांना कार्यालयीन स्तरावर छोटेखानी कार्यक्रमात निरोप देण्यात आला. शनिवारी व रविवारी सुट्टी असल्याने अनेक कर्मचाऱ्यांनी शुक्रवारीच निरोप घेतला. गेल्यावर्षीही लॉकडाऊन असल्याने कर्मचाऱ्यांनी अशाचप्रकारे कार्यालये सोडली होती.