सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या १५७ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी माजी संचालकांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी एक दिवस लांबणीवर गेली असून, आता गुरुवारी १ आॅक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. सुनावणीनंतर आरोपपत्रावरील सुनावणी होणार असल्याने न्यायालयीन निर्णयाकडे लक्ष आहे. चौकशी अधिकारी संपतराव गुंजाळ यांनी या घोटाळ्याप्रकरणी ९६ पानी आरोपपत्र आणि १८ पानी नोटीस तयार केली आहे. लेखी अथवा तोंडी म्हणणे पुराव्यासह सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार तत्कालीन दोन संचालक, दोन वारसदार, एक कार्यकारी संचालक व दोन व्यवस्थापक अशा सातजणांनी चौकशी अधिकाऱ्यांसमोर म्हणणे सादर केले. ९ जण सुनावणीला गैरहजर राहिले. ८४ लोकांनी म्हणणे मांडण्यासाठी मुदतवाढ मागितली. यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल असून, त्यावर दि. ३० रोजी सुनावणी होती. त्यामुळे सुनावणीनंतरची तारीख म्हणणे मांडण्यासाठी मिळावी, अशी मागणी माजी संचालकांनी चौकशी अधिकाऱ्यांकडे केली. त्यानुसार चौकशी अधिकाऱ्यांनी ६ आॅक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली. न्यायपटलावर बुधवारी हे प्रकरण आले नसल्याने गुरुवारी सुनावणीची शक्यता आहे. सुनावणीनंतर चौकशी अधिकाऱ्यांच्या सुनावणीलाही माजी संचालक व अधिकाऱ्यांना सामोरे जावे लागणार आहे. (प्रतिनिधी)
माजी संचालकांच्या याचिकेवर आज सुनावणी
By admin | Updated: October 1, 2015 00:44 IST