रजाअली पीरजादे - शाळगाव शाळगाव, कडेगावसह १५ गावांचे आरोग्य नेवरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हाती दिल्याने लोकांत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, कडेगाव येथे यापूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्र होते. त्या अखत्यारित शाळगाव, कडेगाव, शिवाजीनगर, विहापूर, रेणुशेवाडी, सोहोली, चिखली, कडेपूर, हिंगणगाव बु।।, तडसर, नेर्ली, अपशिंगे, कोतवडे आदी गावांचा समावेश होता. या गावांच्या आरोग्य समस्या कडेगाव प्राथमिक केंद्रामार्फत सोडवल्या जात असत. परंतु सध्या कडेगाव येथे ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यात आल्याने कडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र बंद करून ते नेवरी येथे सुरू करण्यात आले आहे. आता आरोग्याच्या काही समस्या निर्माण झाल्या, तर त्यासाठी वरील गावांच्या लोकांना १५ ते २० कि. मी. पायपीट करून नेवरीला हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे लोकांत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत असून, कडेगाव येथे पूर्ववत आरोग्यसेवा सुरू करण्यात यावी, अशी लोकांची मागणी आहे. कारण एवढे करूनही हेलपाटे मारूनदेखील नेवरी येथे डॉक्टर सापडतील, याची खात्री नाही. मध्यंतरी वरील गावातील पाणी खराब झाल्यावर लोकांनी कडेगाव ग्रामीण रुग्णालयाकडे धाव घेतली. तेव्हा त्यांनी आमचा यांच्याशी संबंध नाही, आपण नेवरी प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क करावा, असे सांगितले. सध्या डेंग्यूची साथ सर्वत्र सुरू झाली आहे. त्यामुळे लोकांत घबराट निर्माण झाली आहे. कडेगावसारख्या तालुक्याच्या गावाला आरोग्यासाठी जर नेवरीला जावे लागत असेल तर, यापेक्षा दुर्दैवी गोष्ट दुसरी नसावी, असे म्हणावे लागेल. याबाबत नेवरी येथील आरोग्याधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, मिटिंगला गेले, असे उत्तर मिळाले. कडेगाव पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी खुर्द व जाधव यांनी सांगितले की, कडेगाव येथे ग्रामीण रुग्णालय झाल्याने येथील प्राथमिक आरोग्य केंद्र नेवरी येथे हलविण्यात आले आहे. त्यामुळे कडेगावसह १५ गावांचा आरोग्य कारभार नेवरी आरोग्य केंद्रामार्फत केला जातो. लोकांच्या हितासाठी आरोग्य सेवा कडेगाव किंवा जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत सुरू करावी, असा प्रस्ताव आम्ही शासनाला दिला होता. त्याप्रमाणे वांगी-देवराष्ट्रे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले. परंतु कडेगावबाबत कोणताही निर्णय कळवण्यात आला नाही. त्यामुळे सध्या या गावची आरोग्य सेवा नेवरी प्रा. आ. केंद्रामार्फत पुरवण्यात येते. त्यासाठी खास करून आरोग्यसेविका नेमण्यात आल्या आहेत. त्यामार्फत वरील गावांच्या आरोग्य सेवा पुरवल्या जात आहेत. वस्तुत: कडेगाव प्रा. आ. केंद्र बंद करण्याबाबत त्यावेळी ग्रामस्थांनी विरोध केला होता. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आरोग्य खात्याच्या या अजब कारभाराबाबत लोकांत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. यावर कायमस्वरुपी तोडगा काढणे काळाची गरज आहे. रुग्णांची गैरसोयकडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारित शाळगाव, कडेगाव, शिवाजीनगर, विहापूर, रेणुशेवाडी, सोहोली, चिखली, कडेपूर, हिंगणगाव बु।।, तडसर, नेर्ली, अपशिंगे, कोतवडे या गावांचा समावेश होता. मात्र ते आता नेवरी येथे सुरू करण्यात आल्याने या गावातील रुग्णांसह नातेवाइकांना विनाकारण १५ ते २0 कि.मी.ची पायपीट करावी लागत आहे.
पंधरा गावांचे आरोग्य ‘नेवरी’च्या हाती
By admin | Updated: November 11, 2014 00:05 IST