मोहन मोहितेवांगी: डिजिटल युगात नात्यातील माणुसकी हरवत चालली आहे. नात्यामध्ये माणूस महत्त्वाचा नसतो, तर महत्त्वाची असते ती नात्यामधील माणुसकी. जात, पंथ, धर्म, वर्ण या सर्वांपलीकडे जगातील सर्वात सुंदर नाते म्हणजे बहीण-भाऊचं नाते. एका दुर्लक्षित, मनोरुग्ण माय माऊलीला जेव्हा भाऊ नावाचा आधार मिळतो, तेव्हा तिला जगण्यासाठी अधिक ऊर्जा प्राप्त होते. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहताना पाहणाऱ्यांची मने भरून जातात. रक्षाबंधनाच्या निमित्ताने ग्रामस्थांनी असा अनोखा बंध अनुभवला.वांगी (ता. कडेगांव) येथे अनेक वर्षांपासून बाळूताई नावाची मनोरुग्ण महिला गावात फिरत असते. तिला भूक लागली की, ज्या घरासमोर ती उभी असते, तिथे जाऊन जेवण करून घेतं. चहा पाहिजे असल्यास ती हॉटेलसमोर जाते; तिला चहा मिळतो. गावातील ग्रामस्थ तिला जे काही पाहिजे ते अगदी आनंदाने देतात. तिचे वांगी येथे कुणीही नातेवाईक नाहीत. काल रक्षाबंधनाच्या निमित्ताने येथील भक्ती मार्गात असलेल्या ज्ञानदेव माळी यांनी मनोरुग्ण असलेल्या बाळूताई यांच्याकडून राखी बांधून घेतली आणि या बहिणीच्या मायेचा आधार दिला.
माणुसकीचे दर्शननाती म्हणजे फक्त रक्ताच्या नसतात, तर काही नाती मानवतेची आणि माणुसकीची ही असतात. आज श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांच्या नात्याची आठवण येते. कारण मनोरुग्ण बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी उचलणारे ज्ञानदेव माळी सारखे माणसे जेव्हा बाळूताईसारख्या गरजू बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घेतात, तेव्हा रक्षाबंधन खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण ठरतो.