मिरज : सांगलीच्या मार्केट यार्डामधील गोदामावर छापा टाकून सुमारे वीस लाख रुपये किमतीचा अवैध गुटखा व तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला. मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी तथा प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक आदित्य मीरखेलकर यांनी शुक्रवारी रात्री ही कारवाई केली. रात्री उशिरापर्यंत पंचनाम्याची व गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर अधीक्षक मनीषा दुबुले यांनी अवैध व्यवसायांवर कडक कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार आठवड्यापूर्वी विजयनगर (म्हैसाळ) येथे मिरज ग्रामीण पोलिसांनी एका दुकानातून गुटखा व तंबाखूचा साठा जप्त करून एकास ताब्यात घेतले होते. या प्रकरणातील फरारी आरोपीस पकडल्यानंतर त्याने आणखी लाखो रुपयांचा गुटखा साठा सांगली मार्केट यार्डात नानवाणी यांच्या दुकानात लपविला असल्याची माहिती पोलिसांना दिली.
संशयितांनी दिलेल्या माहितीनंतर प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक मीरखेलकर यांनी मिरज ग्रामीण पोलिसांच्या पथकासह सांगली मार्केट यार्डात छापा टाकून सुमारे २० लाख रुपये किमतीचा गुटखा व तंबाखूचा साठा हस्तगत केला. अवैध गुटखा तस्करीप्रकरणी एकास ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळाली.
गुटखाप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम कारवाई सुरू होती. पोलिसांनी केलेल्या कारवाईत नेमका किती साठा जप्त करण्यात आला, याचाही पंचनामा सुरूच होता.
चौकट
कर्नाटकातून आयात
राज्यात गुटखा व सुगंधी तंबाखूच्या विक्रीस प्रतिबंध असतानाही कर्नाटकातून त्याची आयात सुरूच आहे. चार महिन्यांपूर्वी पोलिसांनी सुमारे एक कोटी रुपये किमतीची सुगंधी तंबाखू व गुटखा निर्मितीचे साहित्य जप्त केले होते. त्यानंतरही वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत गुटखा व तंबाखूचा साठा जप्त करून कारवाई केली आहे. मात्र अवैध गुटखा व तंबाखू तस्करी सुरूच असल्याचे चित्र आहे.