सांगली : जिल्ह्यातील उद्योग, व्यवसायाची चाके गतिमान झाली असून, उलाढालीचा आलेख वाढत आहे. त्यातूनच जिल्ह्यात सरत्या आर्थिक वर्षात तब्बल १ हजार ४३६ कोटींचे जीएसटी संकलन झाले आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदा १६ टक्के करसंकलन वाढ नोंदली गेली आहे.सांगलीत ३१ हजार ८९५ करदाते नोंदले गेले आहेत. कोरोनाच्या काळानंतर गेल्या काही वर्षांत उद्योग, व्यवसायाची गाडी पुन्हा रुळावर आली आहे. त्यामुळे २०२१ पासून सातत्याने करसंकलनात वाढ हाेताना दिसत आहे. २०२४-२५ या सरत्या आर्थिक वर्षाने चांगले करसंकलन नोंदविले. जिल्ह्यातील आर्थिक उलाढाल वाढत असल्याचे हे लक्षण आहे.
या उद्योगांचे मोठे योगदानवाहनांचे सुटे भाग, फाउंड्री उद्योग, साखर उद्योग, दुग्धजन्य पदार्थांचा व्यवसाय, यंत्रांचे सुटे भाग, अभियांत्रिकी वस्तू, दागिने, रिअल इस्टेट, कंत्राटदार, शीतगृहे यांचे करसंकलन वृद्धीमध्ये मोठे योगदान लाभले आहे.
देश, राज्याच्या तुलनेत अधिक वाढ
- देशात २०२३-२०२४ मध्ये जीएसटी संकलन २० लाख १८ हजार २४९ कोटी रुपये होते. २०२४-२५ या वर्षात २२ लाख ८ हजार ८६१ कोटी इतके संकलन झाले. म्हणजेच ही वाढ ९.४ टक्के नोंदली गेली.
- महाराष्ट्रात २०२३-२०२४ मध्ये जीएसटी संकलन ३ लाख २७ हजार ७३७ कोटी होते. तर २०२४-२५ या वर्षात ते ३ लाख ५९ हजार ८५५ कोटी रुपये झाले. म्हणजेच ९.८ टक्क्यांनी वाढ नोंदली गेली.
- देशाच्या, राज्याच्या तुलनेत जिल्ह्यातील करसंकलन वाढ अधिक आहे.
- विशेषतः बनावट देयके देणाऱ्यांवर नियमित कारवाई, बनावट नोंदणीधारकांची शोधमोहीम आदी गोष्टींमुळे जीएसटी संकलनात वाढ झाल्याचे दिसून येते.
१९३ कोटी रुपयांची वाढ२०२३-२०२४ या आर्थिक वर्षात जीएसटी संकलन १ हजार २४३ कोटी होते. २०२४-२५ मध्ये हा आकडा १ हजार ४३६ कोटींवर पोहोचला. तुलनात्मकदृष्ट्या जीएसटी महसुलात १९३ कोटींची म्हणजे १६ टक्के वाढ झालेली दिसते.
‘एआय’चा वापर वाढविलाकेंद्र व राज्य जीएसटी विभागाने लेखापरीक्षण, तसेच कर चुकवेगिरीविरोधात कारवाया, कर निर्धारण, विवरणपत्रांची छाननी, तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)चा वापर वाढवल्याने त्याचाही सकारात्मक परिणाम या करसंकलनवाढीवर दिसून येत आहे.