अंजर अथणीकर : सांगली :गतवर्षी व यंदाही अनेक साखर कारखाने बंद राहिल्याने सांगलीतील गुळाची आवक सुमारे २० टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या सात महिन्यात गुळाची आवक २६ लाख क्विंटल झाली असून, आगामी महिन्याभरात ही आवक ३१ लाख क्विंटलच्या घरात जाण्याची शक्यता आहे. आवक वाढल्याने गुळाच्या दरातही घसरण झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर व सांगली ही गुळासाठी महत्त्वाची बाजारपेठ समजली जाते. सांगलीमध्ये उत्तर कर्नाटकमधील अथणी तालुक्यातील हारुगिरी, रायबाग तालुक्यातून गुळाची अधिक आवक होते. गेल्या दोन हंगामात कर्नाटक व महाराष्ट्रातील अनेक साखर कारखाने बंद राहिल्याने शेतकऱ्यांनी गूळ उत्पादनाकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्याचबरोबर गुळाचा व्यवहार हा तात्काळ रोखीने असल्यामुळे व यंदा अन्य बाजारपेठांच्या तुलनेत सांगलीत दरही चांगला मिळत असल्यामुळे याठिकाणी गुळाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गुळाचा हंगाम हा एप्रिल ते नोव्हेंबरअखेर चालतो. गतवर्षी सुमारे २२ लाख क्विंटल गुळाची आवक झाली होती. यावर्षी आतापर्यंत २६ लाख क्विंटल गुळाची आवक झाली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत गुळाची सर्वसाधारण ३१ लाख क्विंटल आवक होईल, अशी शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. ही आवक सुमारे वीस टक्क्यांहून अधिक आहे. सांगलीतून जिल्ह्यासह आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा, राजस्थान, गुजरात आदी राज्यांमध्ये गूळ पाठविला जातो. सांगलीमध्ये पाचशे ग्रॅमपासून तीस किलोपर्यंतच्या गूळ भेलींची आवक होते. हा गूळ इतरत्र पाठवला जातो. यावर्षी गुळाचा दर २ हजार ६०० ते ३ हजार दोनशे रुपये क्विंटल राहिला आहे. गतवर्षी २ हजार ७०० ते साडेतीन हजार रुपयापर्यंत गुळाचा दर होता. गतवर्षाच्या तुलनेत गुळाचा दर सुमारे तीनशे रुपये क्विंटलला घटला आहे.सांगलीची गुळाची बाजारपेठ वाढत आहे. रोख व्यवहारामुळे आवकही वाढली आहे. यावर्षी वीस टक्क्यांनी आवक वाढली आहे. आंध्र प्रदेशात नव्याने सांगलीतून गूळ पाठवला जात आहे. यावर्षी आवक वाढल्याने दरातही घसरण झाली आहे. - शरद शहा, अध्यक्ष, गूळ व्यापारी असोसिएशनगुळाची बाजारपेठ एक नजर...एप्रिल ते नोव्हेंबरपर्यंत गुळाचा हंगाम दरवर्षी २० ते २२ लाख क्विंटल आवक यावर्षी ३१ लाख क्विंटल आवक होणारसांगलीच्या बाजारपेठेत शंभर खरेदीदार व्यापारी, तर ४५ अडतेउत्तर कर्नाटकातून गुळाची आवकगुजरात, राजस्थानलाही सांगलीच्या बाजारपेठेतून होतो पुरवठाक्विंटल गुळाचा दर २६०० ते ३२००५00 ग्रॅमपासून ३0 किलोच्या भेली
गुळाची आवक २० टक्क्यांनी वाढली
By admin | Updated: November 18, 2014 23:27 IST