गजानन पाटील-- संख -जत तालुक्यातील सिध्दनाथ येथे पूर्ववैमनस्यातून, राजकीय हेव्या-दाव्यातून दोन सख्ख्या चुलत भावांचा खून झाल्याने नाती-गोती विसरून माणूसपण हरवत चालले की काय? हा प्रश्न उपस्थित होत आहे. दोन सख्ख्या चुलत भावांच्या खुनाने द्राक्ष बागायतदारांचे गाव प्रथमच क्राईम पटलावर आले आहे. मुळात भक्तिमार्गाचे, शांत असणारे गाव या घटनेने चर्चेत आले आहे. तालुक्याच्या पूर्वेला २८ कि. मी. अंतरावर असणारे सिध्दनाथ हे गाव बागायती गाव म्हणून ओळखले जाते. गावालगत तलाव आहे. बोर नदी गावाजवळून वाहते. पाण्याचे बऱ्यापैकी स्त्रोत असल्याने द्राक्ष, भाजीपाल्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. गाव बेदाणा निर्मितीमध्ये अग्रेसर आहे. येथे चांगल्या प्रतीचा बेदाणा तयार केला जातो. गेल्यावर्षी येथील बेदाण्याला उच्चांकी दर मिळाला होता.मुळात येथील माणसे कष्टाळू आहेत. सिध्देश्वर मंदिर आहे. शाकाहारी गाव आहे. गावात कधीही खुनासारखी घटना घडलेली नाही. किरकोळ वादावादी, मारामारी घडली आहे. दुहेरी खुनाने हे गाव तालुक्यात चर्चेत आले आहे.गावापासून १ कि. मी. अंतरावर पश्चिमेला माने वस्तीवर मारुती माने व अण्णाप्पा माने हे सख्खे भाऊ राहत होते. मारुती यांची द्राक्षबाग आहे, तर अण्णाप्पा यांची नवीन लागणीची द्राक्षबाग व पशुपालनाचा व्यवसाय आहे. शेताजवळ तलाव असल्यामुळे उत्पादन बऱ्यापैकी आहे. याच आर्थिक सुबत्तेमधून समाजात, गावात मी मोठा की तू, अशा हेव्यादाव्यातून दरी निर्माण झाली. महिलांची भांडणे तसेच राजकीय वाद याही गोष्टी वादाला करणीभूत ठरल्या. मग हा वाद एकमेकांच्या जिवावर उठला. सध्या घरातील कारभार हा तरुण मुलांच्या हातात आला. तरुणांना कोणाचेच ऐकून घेण्याची सवय नसल्याने सामाजिक भान, भाव-भावकीतील कोणत्याही गोष्टीमध्ये प्रतिष्ठेला धक्का लागला जातो. याचाच प्रत्यय सिध्दनाथमधील दुहेरी खुनामध्ये दिसतो. दोन्ही घरांमध्ये कारभार करणारी तरुण मुलेच आहेत. अण्णाप्पाची राजू, संजू व गजानन ही मुले, तर मारूतीची दऱ्याप्पा, सुखदेव, नवनाथ, पुतण्या सुदेश ही मुले यांच्या हातात घरातील सर्व सूत्रे होती. दोन्ही घरातील तरूण मुले सामाजात, गावात मी मोठा, मलाच प्रतिष्ठा या नावाखाली सर्व नातीगोती विसरून एकमेकांचा द्वेष, मत्सर करु लागली. याअगोदर माने कुटुंबीय सामंजस्याने प्रश्न सोडविणारे होते. परंतु तरूण मुलांच्या आततायीपणामुळे दोघांचा विनाकरण बळी गेला आहे.दोन्ही कुटुंबे संकटातया घटनेमुळे दोन्ही कुटुंबातील कर्ती माणसे गेली आहेत, तर खुनाच्या आरोपाखाली सर्व तरुण मुले तुरुंगात जाणार आहेत. फक्त बायकाच शिल्लक राहणार आहेत. त्यांच्यावरच म्हातारी माणसे, मुलेबाळे यांचा सांभाळ करण्याची वेळ आली आहे. पुरूष मंडळी तुरुंगात गेल्याने कुटुंबे उघड्यावर पडणार आहेत.पुढाकाराची गरज...गावामध्ये अशाप्रकारचे वाद-विवाद, भांडणतंटे सामंजस्याने मिटवून कर्तीसवरती मंडळी, तसेच गावपुढाऱ्याने, सामाजिक कार्यकर्त्यांनी ते सोडविण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. लोकप्रतिनिधींनी कोणतेही राजकारण न करता समाजातील एकोपा राखण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. समाजातील वाद, प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी सर्व समाजाने पुढे येण्याची गरज आहे. सामंजस्याने प्रश्न सोडविण्याची गरज आहे. घरातून संस्कारांचे शिक्षण देण्याची गरज निर्माण झाली आहे.-कृष्णा चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते, दरीबडची
द्राक्ष बागायतदारांचे गाव आले अचानक क्राईम पटलावर...
By admin | Updated: May 11, 2016 00:44 IST