लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्याला देण्याच्या शासन आदेशाविरुद्ध सोलापुरातील उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीने गुरुवारी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या इस्लामपुरातील राजारामबापू कारखाना कार्यालयासमोर आंदोलन केले. अतुल खुपसे-पाटील यांच्या नेतृत्वाखालील उजनी बचावच्या कार्यकर्त्यांनी तेथे आंदोलन केले. दरम्यान, आंदोलकांना उजनीचे पाणी इंदापूरला देण्याचा शासन निर्णय रद्दचे लेखी आश्वासन दिल्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले.
इंदापूर तालुक्यासाठी उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. तेव्हापासून उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीने आक्रमक धोरण स्वीकारले होते. सोलापूर आणि पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात या पाण्यासाठी आंदोलने झाली. इस्लामपुरातील राजारामबापू कारखान्यावर झालेल्या आंदोलनात खुपसे-पाटील, माउली हळवणकर, दीपक भोसले, दीपक वाडदेकर यांच्या नेतृत्वाखाली जमलेल्या कार्यकर्त्यांनी कारखान्यावर आंदोलन केले.
कारखाना कार्यस्थळावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. पोलिसांनी सकाळी ९च्या सुमारास संघर्ष समितीचे उपाध्यक्ष अॅड. बापूसाहेब मेटकरी, यल्लाप्पा पडवळे, भागवत सुमते, संतोष कवले व इतर कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन काही काळासाठी स्थानबद्ध केले. त्यानंतर अतुल खुपसे-पाटील यांनी गनिमी काव्याने कारखाना कार्यस्थळावर प्रवेश करीत आंदोलनाला सुरुवात केली. दरम्यान, जलसंपदा विभागाने २२ एप्रिल रोजी उजनीचे पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्याला देणारा हा निर्णय घेतला होता; मात्र आंदोलकांच्या आक्रमक भूमिकेमुळे हा शासन निर्णय रद्द करण्यात आल्याचे पत्र जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडे पाठवले. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील यांनी शासनाच्या या निर्णयाचे पत्र आंदोलकांच्या हाती सुपुर्द केले. त्यानंतर आंदोलकांनी कारखाना कार्यस्थळावरच जल्लोष करीत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे आभार मानत हे आंदोलन स्थगित केले.