जत : राज्यातील शाळा अद्यापही बंद आहेत. शाळा, महाविद्यालये केव्हा सुरू होतील, हे सांगता येत नाही. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणासाठी गरीब विद्यार्थ्यांना शासनाने मोबाईल किंवा टॅब मोफत द्यावा, अशी मागणी रासपाचे प्रदेश सरचिटणीस व सामाजिक कार्यकर्ते श्रीशैल बिराजदार (सावकार) यांनी केली आहे.
काेरोना संसर्गामुळे मार्च २०२०च्या मध्यावर शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला. याचा परिणाम शिक्षण क्षेत्रावर झाला. शिक्षक आणि विद्यार्थी घरात अडकून पडले. यानंतर प्राथमिक ते अगदी पदव्युत्तर स्तरावरील अध्ययन व अध्यापन ऑनलाईन पद्धतीने सुरू झाले. असे असले तरी हा अभ्यासक्रम सर्वच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे, असे म्हणता येणार नाही. गरीब विद्यार्थ्यांना मोबाईल घेणे जिकरीचे आहे. अनेक लोकांना आजही मुलांसाठी स्वतंत्र मोबाईल घेणे शक्य नाही. शिक्षक असो वा विद्यार्थी काळाबरोबर चालण्यासाठी नवी कौशल्ये आत्मसात करणे आणि ती कालानुरूप अद्ययावत करत जाणे, हे येत्या काळात तग धरून राहण्यासाठी महत्त्वाचे आहे. कर्नाटक शासनाने गरजू मुलांना मोबाईल देणे सुरू केले आहे. त्याचप्रकारे केंद्र किंवा राज्य शासनाने गरीब व होतकरू मुलांना मोबाईल अथवा टॅब माेफत द्यावेत, अशी मागणी बिराजदार यांनी केली आहे.