विकास शहाशिराळा- ऊन व थंडी झेलत जखमी अवस्थेत तो अन्नपाण्याशिवाय सात दिवस पाण्यात निपचित पडला होता. त्याला हालता येत नव्हते. जखमांवर किडे, मुंग्या फिरत होत्या. ज्या ठिकाणी तो पडला होता, तेथून कालव्याचे पाणी जात होते. मात्र पाण्याचा प्रवाह कमी असल्याने त्याच्या अंगाखालून पाणी चालले होते. प्रवाह जास्त असता तर त्याला आपला जीव गमवावा लागला असता, पण त्याच्या आयुष्याची दोरीच बळकट होती. म्हणतात ना.... देव तारी त्याला कोण मारी.... ही अंगावर शहारे आणणारी चित्तथरारक कहाणी आहे, सात दिवस मृत्यूच्या दाढेत अडकलेल्या रुपेशची.अमेणी पैकी खोंगेवाडी (ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) येथील रुपेश विष्णू कदम (वय २६) हा तरुण. ३० जानेवारी रोजी कोकरूड (ता. शिराळा, जि. सांगली ) येथे मामांच्या घरी आला होता. त्याने आपल्या मामासोबत जेवण केले. तो परत गावी गेला. रात्र झाली तरी तो गावी पोहोचला नाही.
दुसऱ्या दिवशीही घरी न आल्याने, व त्याचा मोबाईल बंद असल्याने नातेवाईकांनी व परिवाराने मामाकडे चौकशी केली. मात्र मामानी तो रात्रीच परत माघारी गेल्याचे सांगितले. त्यानंतर रुपेशचा सर्वत्र शोध सुरू झाला. पण रुपेश सापडला नाही. त्यामुळे त्याच्या वडिलांनी रुपेश बेपत्ता असल्याची फिर्याद १ फेब्रुवारीला शिराळा तालुक्यातील कोकरूड पोलिस ठाण्यात दिली.शनिवारी (दि. ६) सकाळी तुरुकवाडी येथील सुभाष पाटील व विलास पाटील हे शेतकरी कालव्याचे पाणी शेतीला पाजण्यासाठी गेले होते. शेतात पुरेसे पाणी येत नसल्याने कालव्याच्या पाण्याच्या मार्गात कुठे अडथळा निर्माण झाला आहे का हे पाहण्यासाठी फिरत होते. त्यावेळी त्यांना शाहीरवाडी येथील सनंदरा शेताजवळ कोकरूड ते तुरुकवाडी दरम्यानच्या मुख्य रस्त्यालगत असणाऱ्या दहा ते पंधरा फूट ओघळात अर्धवट बेशुद्ध अवस्थेत विव्हळत पडलेला तरुण आढळून आला. सोबत मोटारसायकलही आढळली.दरम्यान, तरुण बेपत्ता असल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे सर्वत्र फिरत होती. त्यावरून तो रुपेश असल्याची खात्री त्यांना पटली. त्यानंतर डॉ. नामदेव पाटील, युवराज पाटील, एकनाथ पाटील व ग्रामस्थांनी मिळून रुग्णवाहिकेतून त्यास प्राथमिक आरोग्य केंद्र भेडसगाव येथे उपचारासाठी नेले. पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे नेण्यात आले आहे.त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. वडिलांनी कोकरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. रुग्णालयात जाऊन त्याच्या नातेवाईकांना भेटून तो रुपेश असल्याची खात्री झाली. अधिक तपास पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक फौजदार एस. एल. मोरे हे करीत आहेत.