सांगलीत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांना शौकतभाई पठाण, मंगल पाटील, कमल गुरव, संजय पाटील, विठ्ठल सुळे आदींनी निवेदन दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडवण्याची मागणी पूर्व प्राथमिक शिक्षिकासेविका संघाने केली आहे. जिल्हा परिषदेला मंगळवारी तसे निवेदन देण्यात आले.
संघटनेच्या मागण्या अशा : पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन मराठी भाषेत उपलब्ध करावे, शासनाने दिलेले मोबाईल नादुरूस्त आहेत, त्यामध्ये ॲप डाऊनलोड होत नाहीत, त्यामुळे चांगले स्मार्टफोन द्यावेत. लाभार्थी बालकांचा आधारकार्ड क्रमांक जोडल्याशिवाय त्यांना पोषण आहार मिळणार नाही, अशी अट आहे, त्यामुळे अनेक बालके वंचित राहत आहेत. यास्तव ही अट रद्द करावी.
आवश्यक माहिती नेट कॅफेमध्ये जाऊन भरण्याची सक्ती केली जात आहे, त्यासाठी महिलांना स्वत:चे पैसे खर्च करावे लागत आहेत. त्यामुळे ॲप्लिकेशनची भाषा मराठी होईपर्यंत माहिती भरणार नाही, असा इशारा संघटनेने दिला आहे.
मिनी अंगणवाडीसेविकांना नियमित सेविकेप्रमाणे मानधन मिळावे, नियमित सेविकेची जागा रिक्त झाल्यावर मिनी सेविकेला नेमणूक द्यावी, पर्यवेक्षिकेची पदे सेविका प्रवर्गातून भरावीत, कोविड सर्वेक्षणासाठीचे दोन महिन्यांचे मानधन मिळावे, शाळांना जोडलेल्या अंगणवाड्यांतील कर्मचाऱ्यांना वेतन लागू करावे, मासिक निवृत्तीवेतन मिळावे आदी मागण्याही केल्या आहेत.
संघटनेच्या जिल्हाध्यक्षा मंगल पाटील, शौकतभाई पठाण, शाम कांबळे, विनोद झोडगे, कमल गुरव, कविता उमप, संगीता तवरे, जयश्री चंदनशिवे आदींनी निवेदन दिले.
चौकट
वर्षाला २१ हजार मिळावेत
शालेय पोषण आहार योजनेतील कर्मचाऱ्यांना मासिक दीड हजार रुपये इतके तुटपुंजे मानधन मिळते. ते वाढवून वर्षाला किमान २१ हजार रुपये मिळावेत, अशी मागणीही संघटनेने केली आहे.