मिरज : मिरजेत खासगी शिकवणी वर्गातील एका शिक्षिकेने गृहपाठ केला नसल्याच्या कारणावरून दहावीतील विद्यार्थिनींना तब्बल दोन तास वर्गात कोंडून ठेवल्याची घटना घडली. विद्यार्थिनींनी मोबाईलवरून पालकांशी संपर्क साधल्यानंतर पालकांनी धाव घेऊन त्यांची सुटका केली. याबाबत पालकांनी संबंधित शिक्षिकेला धारेवर धरले. पालकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने त्या शिक्षिकेची हकालपट्टी करण्यात आली. मिरज हायस्कूल रस्त्यावर माध्यमिक विभागाचा खासगी शिकवणी वर्ग सुरू आहे. दहावीतील काही विद्यार्थिनींनी आज गृहपाठ केला नसल्याने शिक्षिकेने ८ ते ९ विद्यार्थिनींना तब्बल दोन तास मोकळ्या खोलीत कोंडून ठेवले. काही विद्यार्थिनींनी अंधाऱ्या खोलीत गृहपाठ पूर्ण केला; मात्र काही विद्यार्थिनींचा गृहपाठ पूर्ण होण्यास विलंब झाल्याने शिक्षिकेने कोणाचीही सुटका करण्यास नकार दिला. यामुळे भयभीत झालेल्या मुलींनी आरडाओरडा सुरू केला. काही विद्यार्थिनींनी मोबाईलवरून पालकांशी संपर्क साधून त्यांची सुटका करण्याची मागणी केली. हा धक्कादायक प्रकार समजल्यानंतर संतप्त पालकांनी शिकवणी वर्गात धाव घेतली. त्यानंतर कोंडून ठेवलेल्या विद्यार्थिनींना बाहेर काढण्यात आले. पालकांनी शिक्षेबाबत शिक्षिकेस जाब विचारला असता शिक्षिका व पालकांत वादावादीचा प्रकार घडला. या प्रकाराने पालक चांगलेच संतप्त झाले होते. पालकांनी या शिक्षिकेला काढून टाकण्याची जोरदार मागणी केली. त्यानंतर संचालकांनी शिक्षिकेवर कारवाई केली. (वार्ताहर)काही पालकांनी आक्रमक पवित्रा घेऊन पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा इशारा दिला. प्रकरण वाढू नये यासाठी शिकवणीच्या संचालकांनी शिक्षिकेस तातडीने कामावरून काढून टाकले. विद्यार्थिनींना कोंडून ठेवण्याच्या घटनेमुळे शिकवणी वर्गासमोर गर्दी झाली होती. या घटनेबाबत मिरज पोलिसांत संबंधित विद्यार्थिंनीच्या पालकांनी तक्रार दिली नसल्याचे सांगण्यात आले. या प्रकारामुळे मिरजेत खळबळ उडाली आहे. किरकोळ कारणावरून विद्यार्थिंनी कोंडून घालण्याच्या प्रकाराचा निषेधही होत आहे.
मिरजेत विद्यार्थिनींना दोन तास कोंडल
By admin | Updated: September 16, 2014 23:38 IST