संजयकुमार जाधव -- भोसेभोसे (ता. मिरज) येथील डॉ. नमिता पाटील व पंकज पाटील यांनी मुलीच्या वाढदिवसाच्या खर्चास फाटा देऊन, सावित्रीबाई फुले यांच्या चारशे चरित्र ग्रंथांचे वाटप जिल्हा परिषदेच्या शाळेत केले. या उपक्रमाचे गावात कौतुक होत आहे. डॉ. नमिता व प्रा. पंकज यांनी समाजप्रबोधनाचे कार्य हाती घेत, मुलीच्या वाढदिवसाला विद्यार्थ्यांना पुस्तकांची भेट देऊन वाचन संस्कृती वाढविण्यासाठी प्रयत्न केला आहे. समाजासमोर आदर्श ठेवताना मुलगी नको म्हणणाऱ्या पालकांच्या डोळ्यात त्यांनी अंजन घातले आहे. त्यांची कन्या अन्वी हिचा दुसरा वाढदिवस साधेपणाने साजरा करतानाच, सावित्रीबाई फुले यांचे चारशे चरित्र ग्रंथ त्यांनी शाळेला भेट दिले. विशेष म्हणजे दुर्लक्षित समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद शाळेतील मुलांना त्यांनी हे ग्रंथ भेट दिले. हे चरित्र डी. बी. पाटील यांनी लिहिले आहे.यावेळी सेवानिवृत्त प्राचार्य विजय कोंगनोळे म्हणाले की, पुस्तके भेट देऊन पाटील कुटुंबियांनी नवीन उपक्रम सुरू केला आहे. असे उपक्रम अधिकाधिक होण्याची गरज आहे. उपसरपंच सचिन चौगुले, मुख्याध्यापिका मंगल चौगुले, भरत कांबळे, शिवानंद बढेश यांनीही ग्रंथाचे महत्त्व सांगितले. (वार्ताहर)
भोसेत मुलीच्या वाढदिनी चारशे चरित्र ग्रंथांची भेट
By admin | Updated: January 15, 2016 00:17 IST